अभिनेते सुबोध भावे यांची साताऱ्यात आज प्रकट मुलाखत

। लोकजागर । सातारा । दि. ०३ मार्च २०२५ ।

मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्ममाने साताऱ्यात मराठी भाषा पंधरवडा सुरु आहे. या अतंर्गत अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, ही मुलाखत सोमवार दि.३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहू कलामंदिर येथे  होणार आहे. मसाप,पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे  हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी मसाप पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपचे प्रतिनिधी श्रीराम नानल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली.  कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करत असत. त्यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत. सुबोध भावेंनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. आभाळमाया, अवंतिका, मनाचिये गुंती, गीतरामायण, बंधन, दामिनी, ऋणानुबंध, रिमझिम, झुंज, तुला पाहते रे, चंद्र आहे साक्षीला अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यापैकी झी मराठी वरील २०१८ साली प्रदर्शित झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड गाजली होती.  त्यांचे घेई छंद हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीमधून त्यांचे अतरंग सातारकरांपुढे उलगडणार असून या मुलाखतीस साहित्यप्रेमी आणि सातारकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सदस्यांनी केले आहे.

Spread the love