एखादा जीव जाण्याअगोदर रुंदीकरण केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करा : कापडगाव – आरडगाव परिसरातील ग्रामस्थांची मागणी

। लोकजागर । फलटण । दि. ०५ मार्च २०२५ ।

कापडगाव – आरडगाव रस्त्याचे रुंदीकरण करुन खडीकरण करण्यात आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्यावर छोटे – मोठे अपघात घडत आहेत. या ठिकाणी अपघातात एखादा जीव जाण्याअगोदर या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी संतप्त मागणी कापडगाव – आरडगाव परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.

कापडगाव आरडगाव रस्त्याचे दुतर्फा रुंदीकरण झाले असून रस्ता जीसीपी ने उकरून खडीकरण केलेले आहे. रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे मात्र एका बाजूला जास्त खडी तर दुसर्‍या बाजूला कमी खडी टाकली असल्याने रस्ता एकसारखा झाला नाही. त्यातच खडीकरण रस्त्यावर लहान खडी टाकल्यामुळे अनेक अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने त्यावर जाऊन ती खडी रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहने, सायकलस्वार या रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीमुळे गाडीवर घसरून पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये या रस्त्यावर टाकलेल्या खडीवर घसरून तीन दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये आजारी असलेली एक वयोवृद्ध महिला मोटरसायकलवरुन लोणंदला जात असताना गायकवाड वस्तीच्या कॉर्नरच्या रस्त्यावर टाकलेल्या खडीवर घसरून पडल्याने सदर महिलेच्या डोक्याला चार-पाच टाके पडले आहेत. या नवीन रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर गाडी चालवताना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे. रात्रीच्या वेळी पाठीमागून जर चार चाकी गाडी आली तर त्या गाडीच्या लाईटच्या प्रकाशाने पुढील दुचाकीचा चालकाला आपली गाडी रस्त्याच्या बाजूला घ्यावी लागत आहे, त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण व्हावे अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

रस्ता रुंदीकरण होऊन अनेक महिने होऊन गेले आहेतमात्र यावर डांबरीकरण न झाल्याने रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या बारीक खडीमुळे अनेक जण गाडीवरून घसरून पडत आहेत. याठिकाणी अपघात होवून एखादा जीव जाण्याअगोदरच या रस्त्याचे डांबरीकरण तत्पर करावे अन्यथा एखादा जीव गेल्यास त्या सर्वस्वी जबाबदार संबंधित बांधकाम खात्यास धरले जाईल. – अनिल भोईटे, आरडगांव.

Spread the love