। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक तक्रारींच्या फेर्यात अद्याप अडकली असून तक्रारदारांनी यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश सहकार विभागाकडून काल जारी करण्यात आला आहे.

निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या कारखान्याच्या निवडणूक मतदार याद्या चुकीच्या असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणूकीस स्थगिती देऊन प्रशासक नेमण्याबाबत मागणी केली होती. तथापी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांनी कारखान्याच्या अंतिम मतदार यादीमधून २१२४ मयत सभासद कमी झाले असल्याचे सांगून कारखान्याने निवडणूक निधीची रक्कम रु. १५ लाख जमा केली असल्याने कारखान्यावर प्रशासक नेमता येणार नाही असे दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी आदेशाद्वारे स्पष्ट केले होते. तथापी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात विश्वासराव भोसले यांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्रमांक ९१७७/२०२५ दाखल केलेली आहे. सदर याचिकेत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांचा दि. २० फेब्रुवारी २०२५ चा आदेश रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे सदर याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीराम कारखान्याची गत पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०२० मध्ये पार पडली होती. या निवडणूकीत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वातील श्रीराम पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत बाजी मारली होती. विशेष म्हणजे या २१ जागांपैकी १५ उमेदवार बिनविरोध तर ६ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्त्वात राजे गटाकडे गत २० वर्षांपासून एकतर्फी असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याने यासंबंधीच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
