। लोकजागर । फलटण । दि. १६ मार्च २०२५ ।
‘‘श्रीराम आणि साखरवाडीचा कारखाना चुकून बंद पडला तर कुणाचा फायदा होईल हा विचार करा. श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमून कारखान्याचं वाटोळ करायचं आणि कारखान्याचं एकदा वाटोळं झालं की हा ऊस तिकडं न्यायचा एवढा सरळ – साधा हिशोब आहे’’, अशी टिका महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजाळे (जाधववस्ती) येथे बोलताना केली.

जाधववस्ती, राजाळे (ता.फलटण) येथील कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा व प्रवेश मेळावा आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह राजाळे गावातील आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘‘श्रीराम कारखान्याविरोधात बोलणारे राजाळे येथील पुढारी स्वत:चा ऊस कुठे घालतात हे त्यांनी सांगावे. आता मी पण शांत बसणार नाही. त्यांनी निवडणूकीत उभं राहूनच दाखवावे’’, असे आव्हान कारखाना निवडणूक प्रक्रियेविरोधातील याचिकाकर्ते विश्वासराव भोसले यांना आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिले.
‘‘तीन महिन्यात सत्ता बदल झाल्यानंतर तालुक्यातील चांगल्या अधिकार्यांनी बदलीचे अर्ज केले आहेत. निरा – देवघरसाठी डोंगरात मी फिरलो. धरण मी बांधलं आणि आता कालव्याचं काम होत आल्यावर ते सगळं त्यांनी केलंय असं सांगत आहेत. धरणच जर झालं नसतं तर कालवा झाला असतां कां?’’, असा सवाल उपस्थित करुन ‘‘आपलं पाणी सांगोल्याला द्यायला ते निघाले आहेत. तालुक्यातील 36 गावांचं पाणी कमी होवून त्याचा परिणाम ऊसाच्या क्षेत्रावर आणि इथल्या कारखान्यांवर होणार आहे’’, असेही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘इतके दिवस हा फुटला – तो फुटला असं सुरु होतं. पण आता आमच्याकडं इनकमिंग सुरु झालं आहे. वादळापूर्वीची ती शांतता होती. आता वादळ जवळ आलं आहे. आता तुम्ही सावध राहा’’, असा इशारा विरोधकांना देत ‘‘पैसा, सत्ता आणि प्रशासकीय अधिकार्यांना हाताशी धरुन केलेली दहशत लोक जास्त दिवस सहन करत नाहीत. जाधव कुटूंबातील कार्यकर्त्यांनी आज आपल्याकडे प्रवेश केला आहे. जीवात जीव असे पर्यंत मी तुमच्या सोबत असेन. आमच्या कुटूंबाकडून झालं तर सोनंच होतं आम्ही तुमचा कोळसा करणार नाही.’’, असा विश्वासही आ. श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना आ. श्रीमंत रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, माणिकराव सोनवलकर यांच्यावर टिका करत जोरदार तोंडसुख घेतले. माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.