डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून मागितली १ कोटीची खंडणी; शिरवळ पोलीसांकडून आरोपी जेरबंद

। लोकजागर । सातारा । दि. १७ मार्च २०२५ ।

खाजगी क्लिनीक चालवणार्‍या डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून १ कोटीची खंडणी मागणार्‍या आरोपींना जेरबंद करण्यात सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीसांना यश आले आहे.

याबाबत पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील खंडाळा तालुक्यात क्लिनिक चालविणारे डॉक्टर यांचेशी सलगी वाढवून त्यांनी त्यांचे क्लिनिकमधील महिला कामगार हिचेशी केलेल्या वर्तनाचे संबंधित महिलेने व्हिडीओ चित्रण केले होते. त्या चित्रिकरणाचा वापर करुन व तुमचे वैद्यकीय लायन्सन रद्द करुन तुमची बदनामी करु अशी धमकी फोनवरुन अज्ञात इसमाने संबंधित डॉक्टरांना देत त्यांच्याकडे रु. १ कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. दि. ६ मार्च २०२५ पासून संबंधित आरोपी डॉक्टर व त्यानंतर त्यांचे पत्नीस मोबाईल संदेश व फोन करुन धमकावून खंडणीची मागणी करत होता.

या खंडणीखोराविरोधात डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीची गोपनियता ठेवून सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, महादेव शिद, पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट यांच्यासह प्रशांत धुमाळ, सुरज चव्हाण, अजित बोराटे, भाऊसाहेब दिघे, अरविंद मार्‍हाळे, स्नेहल शिंगटे, निलिमा भिलारे, संतोष इंगवले या पोलीस कर्मचार्‍यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या.

त्यानंतर संबंधित डॉक्टरांच्या पत्नीच्या मोबाईलवर खंडणीखोरांकडून रु. १ कोटी घेऊन रामेश्‍वर मंदिर, शिरवळ परिसरात येण्याचा संदेश आला होता. त्यानुसार सदर परिसरात शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सापळा रचून थांबले होते. दि. १५ रोजी दुपारच्या सुमारास डॉक्टर व त्यांच्या पत्नी ठरलेली रक्कम घेवून सदर ठिकाणी आल्यानंतर दोन इसम खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले. त्यांनी रक्कम घेतल्यानंतर ते निघून जाण्याच्या तयारीत असताना जवळच लपलेल्या पोलीसांनी त्या दोघांना पकडून ताब्यात घेतले. सदर खंडणीखोरांनी त्यांची नावे १) नितिन नवनाथ प्रधान (वय २०, मुळ रा. कारी, माजलगाव, जि. बीड, हल्ली रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा), २) दत्ता आप्पाराव घुगे (वय २४, मुळ रा. कासारगाव, ता. जि. लातूर, हल्ली रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी सांगितली आहेत. सदर आरोपींकडून खंडणीची रक्कम ठेवलेली पर्स, मोटारसायकल, मोबाईल, सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले असून खंडणीची मागणी करणार्‍या नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाणेस येवून तक्रार नोंदवावी. आपले नाव गुपित ठेवून खंडणीखोरांवर कठोर कारवाई होईल, असे आश्‍वासन पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे.

Spread the love