खुंटलेला विकास जलदगतीने सुरु राहण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश : सचिन रणवरे

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ ।

‘‘गेल्या 20 – 25 वर्षांपासून आम्ही कोळकीच्या राजकारणात काम करत आहोत. जास्त राजकारण न आणता समाजकारणावर भर देवून आम्ही कामे केली आहेत. खुंटलेला विकास इथून पुढे जलदगतीने सुरु रहावा यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे’’, असे फलटण पंचायत समितीच्या कोळकी गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे यांनी स्पष्ट केले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास ठेवून राजेगटाला सोडचिठ्ठी देत कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास नाळे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पैलवान संजय देशमुख, युवा नेते किरण जाधव, सागर चव्हाण, सागर काकडे व इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी सचिन रणवरे बोलत होते.

‘‘कोळकीत पाण्याचा प्रश्‍न आहे. दोन – तीन दिवसातून येणारे पाणी रोज येण्यासाठी मी रणजितदादांना सांगितलं आहे. त्यांनी ते तात्काळ मान्य करुन इथला पाण्याच्या टँकचा प्रश्‍न मार्गी लावण्याचं त्यांनी आश्‍वासन दिलेलं आहे. तसेच कोळकीचा विकास आराखडा तयार करुन त्यादृष्टीने इथला विकास करु असाही शब्द रणजितदादांनी आपल्याला दिलेला आहे’’, असे सांगून ‘‘गिरवी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील ग्रामपंचायतींचीकडे लाईट बील भरण्यासाठी पैसे नाहीत; तेथे सौरऊर्जेवर आधारित योजना सुरु करुन त्या गावांना दिलासा देण्यात यावा व त्यांची थकीत वीज बिले शासनामार्फत माफ करण्याची भूमिका रणजितदादांनी घ्यावी’’, अशी विनंतीही यावेळी सचिन रणवरे यांनी केली.

‘‘भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिल्याबद्दल आभार मानून पूर्वीप्रमाणेच आमचे विकासात्मक काम सुरु राहील’’, असेही सचिन रणवरे यांनी शेवटी सांगितले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love