लाल बावटा हा स्वाभिमानाचा झेंडा : कॉ. अतुल दिघे

कॉ. जीवन सुरडे यांना कॉम्रेड धैर्यशील पाटील स्मृती युवा पुरस्कार प्रदान

। लोकजागर । सातारा । दि. १७ मार्च २०२५ ।

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारधारेवर आधारित पूर्वसुरींनी आम्हास स्वाभिमानाचा रस्ता दाखवलेला आहे. त्या रस्त्यानेच आम्ही जाणार आहोत. स्वाभिमानाचा झेंडा हा लाल बावटा आहे आणि तो घेऊन पुढे जाणार आहे. या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नये आणि त्या दृष्टीनेच आम्ही लोकशाही रक्षणासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी व कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समिती , सातारचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे यांनी सातारा येथे बोलताना केले.

सातारा येथील विविध कामगार संघटनांच्या वतीने सातारा येथील कामगार नेते कॉ. धैर्यशील पाटील यांच्या स्मृत्यर्थ कॉ. धैर्यशील पाटील स्मृती युवा पुरस्कार श्रीरामपूर येथील कष्टकरी चळवळीचे युवा नेते कॉ. जीवन सुरुडे यांना सातारा येथे पुणे महानगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष व श्रमिक संघ महाराष्ट्राचे महासचिव कॉ. उदय भट व कॉ. अतुल दिघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी कॉ. अतुल दिघे बोलत होते. या कार्यक्रमाला जोडूनच कॉ. चंद्रकांत निकम यांच्या स्मृत्यर्थ कॉ. अतुल दिघे यांचे व्याख्यान झाले.

शहीद भगतसिंग ब्रिगेड व सफाई कर्मचारी संघटना आणि सर्व श्रमिक महासंघाच्या चळवळीच्या माध्यमातून कॉ. जीवन सुरुडे यांनी महाराष्ट्रात अनेक नगरपालिकांतील कामगारांचे प्रश्न संघर्ष करून सोडवलेले आहेत. या त्यांच्या कामाबद्दल त्यांना कामगार नेते कॉ. धैर्यशील पाटील यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या संघटित क्षेत्राबरोबरच असंघटित क्षेत्रातल्या श्रमिक व कष्टकरी वर्गापुढे अनेक प्रश्न आ वाचून उभे आहेत असे असतानाही धर्म , जात याला बळी न पडता शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉ. जीवन सुरुडे यांनी रस्त्यावरच्या संघर्षा बरोबरच न्यायालयीन संघर्ष ही केला व त्यात ते यशस्वी झालेले आहेत त्यामुळे त्यांचा हा सत्कार हा चळवळीचा सत्कार आहे, असे कॉ. उदय भट यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांनी व क्रांतिकारकांनी रक्त सांडून, तुरुंगवास भोगुन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते स्वातंत्र्य टिकवणे हे आजच्या पिढीचे काम आहे आणि धर्म व जातीच्या नावाखाली समाजात विद्वेषाचे वातावरण पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत; त्या उद्योगाला बळी न पडता समाजात मानवतेचे बीज रोवणे हे कामगार चळवळीचे काम आहे आणि ते आम्ही अखेरपर्यंत करत राहू, असे सत्काराला उत्तर देताना कॉ. जीवन सुरुडे यांनी सांगितले.

यावेळी सातारा येथील कॉ. विद्याधर देशमुख ( बँक एम्प्लॉईज युनियन) , कॉ. रेखाताई खंडूझोडे (म्युनिसिपल कामगार युनियन , सातारा) , कॉ. शंकर पाटील ( गिरणी कामगार संघटनेचे नेते ), कॉ. जगन्नाथ जंगम ( कोतवाल संघटना ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कॉ. व्ही एन पाटील स्मारक समितीचे सदस्य विजय मांडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँक एम्पलॉइज युनियनचे कॉ. प्रमोद परमणे यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कॉ. व्ही.एन. पाटील , कॉ. धैर्यशील पाटील व कॉ. चंद्रकांत निकम यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी विजय निकम , विवेक निकम , महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सुरुडे , सर्व श्रमिक संघ सांगलीचे अध्यक्ष गोपाळ पाटील , अहमदनगरचे शरद ससुरे , जयंत उथळे , प्रा. दत्ताजीराव जाधव , कॉ. श्याम चिंचणे , प्रा. संजीव बोंडे , अनिल मोहिते , सलीम आतार , शंकर माने आदी उपस्थित होते.

Spread the love