लालासाहेब चव्हाण यांचे निधन; युवा कवी अविनाश चव्हाण यांना पितृशोक

। लोकजागर । फलटण । दि. १८ मार्च २०२५ ।

फलटण शहरातील लालासाहेब मारुती चव्हाण यांचे दिनांक १६ मार्च २०२५ रोजी दुपारी १:२० वाजता दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. लालासाहेब चव्हाण हे प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, एक सून आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लालासाहेब चव्हाण यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. लहान वयातच त्यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. मात्र, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्यापेक्षा लहान व्यक्तींशीही आदराने बोलणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. तारुण्यातील संघर्ष आणि गरिबीच्या झळा कधीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेऊ शकल्या नाहीत. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी आपल्या छातीवर विठ्ठल-रखुमाईचे गोंदण करून घेतले होते. कर्म हाच धर्म मानून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगले. ते एक निष्ठावान वारकरी होते. तुकाराम बीज या पवित्र दिवशी त्यांनी देह ठेवला.

Spread the love