। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।
पाण्याची उपलब्धता असताना केवळ योग्य नियोजनाअभावी लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पाणी वितरण व टंचाई बाबत योग्य नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

फलटण पंचायत समिती सभागृहात आयोजित टंचाई आढावा व धोम – बलकवडी पाणी वितरण नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. सचिन पाटील होते.
धोम – बलकवडी आवर्तन विषयी स्पष्ट सूचना देताना ८० ते १०० क्युसेक्स पाणी धोम – बलकवडी कालव्यातून संबंधीत गावच्या तलावात सोडण्यात यावे, जावली येथील हेकळवाडा तलावामधील पाण्याबाबत महसूल मंडलाधिकारी यांनी माहिती घ्यावी, तेथील पोलीस पाटील व तलाठी यांचेकडून सदर तलावाचे फोटो घेण्याच्या सूचना माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.
जलजीवन मिशन व टंचाई अंतर्गत तालुक्यातील विविध गावात मंजूर, पूर्ण, सुरु असलेल्या व अपूर्ण कामांचा आढावा घेवून सदर कामे तात्काळ पूर्ण करणेच्या सुचना आ. सचिन पाटील यांनी यावेळी दिल्या.
पुरवणी आराखडा तयार करुन त्यामध्ये टंचाई कृति आराखडयात समाविष्ट नसलेली विविध गावांमधील टंचाई कामे समाविष्ट करणेबाबत आ. सचिन पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
टंचाई घोषित गावाचे प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये घ्यावयाच्या उपाय योजनाची तपशीलवार माहिती घेणेबाबाबत स्पष्ट सूचना करताना कोणतेही गाव, वाडी वस्तीवर जनावरे व लोकवस्तीसाठी नियम निकषाप्रमाणे आवश्यक पाणी उपलब्ध होईल याप्रमाणे नियोजन व टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रांताधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर यांनी बैठकीत संबंधीत यंत्रणांना केल्या.
ग्रामपंचायत वडले, वांजाळे तलाव १०० टक्के भरले असल्याचे यावेळी धोम – बलकवडी कार्यकारी अभियंता यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी सतिश कुंभार गटविकास अधिकार यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर टंचाई आढावा बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. फलटण तालुक्यात एकूण ३१ गावे टंचाई घोषित प्रस्तावित असून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करणेत आल्याचे निदर्शनास आणून दिले.
बैठकीचा समारोप करताना टंचाई निवारण अनुषंगाने दिलेल्या सुचना नुसार कार्यवाही करणेत येवून टंचाई उपाय योजना राबविणेत येतील याची ग्वाही देत गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेचा समारोप केला.
यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक माणिकराव सोनवलकर, प्रांताधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी सतिश कुंभार, धोम – बलकवडी कार्यकारी अभियंता एस. आर. बोडखे, उप अभियंता सतिश भुजबळ, उप विभागीय अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फलटण पी. के. कुलकर्णी, उप अभियंता धोम – बलकवडी हरणे, कनिष्ठ अभियंता युवराज खंडागळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. फाळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल दिघे, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी फलटण कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर, नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव, फलटण व लोणंद येथील पोलीस अधिकारी, विविध शासकीय खात्यांचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, महसूल मंडलाधिकारी, तलाठी, शेतकरी उपस्थित होते.