शिंदेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
। लोकजागर । फलटण । दि. ३१ मार्च २०२५ ।
‘‘बलिदान मास’च्या आयोजनातून छत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदू धर्मावरील त्यागाला आणि अतुल्य बलिदानाला वंदन केले जाते. त्यासाठी प्रत्येकानी आपापल्या गावात बलिदान मासाचे आयोजन केले पाहिजे’’; असे विचार इतिहासप्रेमी व नाणेसंग्राहक सचिन भगत यांनी व्यक्त केले.

शिंदेवाडी (ता.फलटण) येथील जिल्हा परिषद शाळेत बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
‘‘आपण सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवायला हवी’’, असे सांगून मृत्युंजय अमावस्येचे व छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारे बलिदान दिले याबाबतचे महत्त्व इतिहासातील वेगवेगळे प्रसंग व दाखले देत यावेळी सांगितले.
प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.