रक्तदान शिबीर, शैक्षणिक व वैद्यकीय मदत अशा सामाजिक उपक्रमांसह धार्मिक कार्यक्रम संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. ०४ एप्रिल २०२५ ।
फलटण शहरातील अहिल्यानगर (गजानन चौक) येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थांचा १६९ वा प्रकट दिन सामाजिक उपक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पार पडलेल्या या कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती देताना मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी सांगितले की, यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिनांक 30 व 31 मार्च रोजी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रक्तदान शिबीरात 250 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदात्यांना चांदीची स्वामींची मूर्ती, रोप तसेच महिला रक्तदात्यांना पैठणी साडीचे वितरण करण्यात आले. सदरचे शिबर ऋषिकेश बिचुकले यांच्या सहकार्याने पार पडले. तसेच दि. 30 रोजी इयत्ता 1 ली ते 7 वी च्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वैद्यकीय मदत करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमांबरोबरच श्रीं च्या मूर्तीस अभिषेक, आरती, महाआरती, भजन, आदी धार्मिक कार्यक्रमही पार पडले. दि. 31 रोजी प्रकट दिनी आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा तब्बल चार ते पाच हजार भाविकांनी लाभ घेतला, असेही संजय चोरमले यांनी सांगितले.
हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.