रामोशी समाज शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कार्यशाळेचे आयोजन व्हावे : रविकाका खोमणे

जेजुरी येथे हरी मकाजी नाईक यांना अभिवादन

। लोकजागर । फलटण । दि. ०४ एप्रिल २०२५ ।

आजचा रामोशी समाज हा आजही शिक्षणापासून वंचित राहत आहे. या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देवुन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वानी एकत्र येऊन कार्यशाळेचे आयोजन करणे योग्य ठरेल व हीच हरी मकाजी नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत भाजपचे भटक्या विमुक्त जातीचे पुणे जिल्हाध्यक्ष रविकाका खोमणे यांनी व्यक्त केले.

हरी मकाजी नाईक यांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त जेजुरी (पुणे) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, भाजपचे भटक्या विमुक्त जातीचे पुणे जिल्हा अध्यक्ष रविकाका खोमणे, बाबा चव्हाण, फलटण तालुका अध्यक्ष मनोज आडके, गणेश पाटोळे, शोभाताई चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री खोमणे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्राची प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक हरी मकाजी नाईक. हरी मकाजी नाईक यांनी साताऱ्यातील रामोश्यांना एकत्र करून ब्रिटिश राजवटीविरोधात चळवळ सुरू केली. त्यांनी आपल्या जिवनकाळात गोरगरिब जनतेसाठी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. इंग्रजांनी मकाजी नाईक यांना पकडून देणार्‍याला बक्षिस जाहिर केले होते. इ.स. १८७८ च्या सुरवातीला हरी मकाजी नाईक यांनी इंग्रजांच्या अखत्यारीतील पुण्यातील शासकीय कार्यालय, कोषागार व कार्यालयावर हल्ला केला. त्यांनी सलग १५ हल्ले करून इंग्रज सरकारचे कंबरडे मोडले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातुन अभिवादनासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.

Spread the love