आमदार सचिन पाटील यांच्या प्रश्नावर पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांचे आश्वासन
। लोकजागर । फलटण । दि. ६ एप्रिल २०२५ ।
फलटण – कोरेगाव मतदार संघातील कोणत्याच गावाला पाणी टंचाई होऊ देणार नाही व त्याकरिता टँकर असो किंवा खाजगी विहीर अधिग्रहण असो याकरिता लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार सचिन पाटील, आमदार अतुलबाबा भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे, सर्व प्रातांधिकारी, सर्व तहसीलदारासह आदी कार्यान्वयन यंत्रणाची यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर बैठकीवेळी आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील 32 टंचाई ग्रस्त व उत्तर कोरेगाव मधील 26 गावांच्या टंचाई बद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी पालकमंत्री देसाई यांनी फलटण कोरेगाव मतदार संघातील कोणत्याच गावाला पाणी टंचाई होऊ देणार नाही व त्याकरिता टँकर असो किंवा खाजगी विहीर अधिग्रहण असो याकरिता लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. तसेच कोणत्याही प्रकारे टंचाई काळात कामचुकारपणा खपवून घेणार नाही अश्या आदेश वजा सूचना त्यांनी फलटण – कोरेगाव प्रशासनास दिल्या.
