। लोकजागर । फलटण । दि. 02 जून 2025 ।
एस.टी.चा 77 वा वर्धापन दिन फलटण आगारात विविध उपक्रम राबवून अतिशय आनंदात ,उत्साहात साजरा करण्यात आला. सन १९४८ साली १ जुन रोजी अहमदनगर – पुणे मार्गावर प्रथम एस.टी. धावली. त्यामुळे १ जून हा दिवस एस.टी. महामंडळाचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो.

वर्धापन दिना निमित्त फलटण आगारात सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. केळीचे खुंट व नारळाच्या फांद्या प्रत्येक फलटावर लावण्यात आल्या होत्या. ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना शुभेच्छा देण्यात येत होत्या.
मुख्य समारंभात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांच्या हस्ते सजवलेल्या बसचे विधिवत पूजन करून, पुष्पहार घालून बस पुढे केक कापण्यात आला. उपस्थित प्रवाशांना गुलाब फुले व पेढे वाटण्यात आले.
यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक गजानन रिटे यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे एस.टी .प्रशासनाच्या वतीने शाल व मोती माळा व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एस.टी.च्या कायम प्रवाशी प्रा. सायरा मुलाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बस स्थानक स्वच्छ करणाऱ्या महिलांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनि फलटण आगाराच्या प्रवाशी सेवेबद्दल समाधान व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.