ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांचे निधन

। लोकजागर । फलटण । दि. 18 जुलै 2025 ।

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव (वय 63) यांचे नागपूर येथे गुरुवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 1 मुलगा, विवाहित मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव शनिवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजता गुणवरे ग्रामपंचायत येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तेथूनच अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर गुणवरे येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

प्रा. रमेश आढाव यांचा थोडक्यात जीवनपट

प्रा. रमेश आढाव विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मराठी पत्रकारिता क्षेत्रात सुमारे गेल्या 32 वर्षांपासून कार्यरत कार्यरत होते. सन 1993 साली साप्ताहिक ‘एकता दर्शन’ चे संपादक, सन 1996 साली साप्ताहिक ‘फलटण वार्ता’चे संपादक, सन 2000 साली साप्ताहिक ‘सुभाषित’ चे संपादक म्हणून काम करत असतानाच सन 1998 साली दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर सन 2002 पासून दैनिक तरुण भारत (बेळगाव) च्या सातारा जिल्हा आवृत्तीचे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून ते आजही कार्यरत होते.

पत्रकारितेबरोबरच सुरुवातीच्या काही काळात महाविद्यालयामध्ये अध्यापन सेवा करुन अधिकाधिक सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणीचें निवारण, गोरगरीब ग्रामीण अशिक्षित लोकांना येणार्‍या अडचणी तत्परतेने सोडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. ग्रामीण भागात सुरु असलेल्या अनेक अंधश्रद्धांमधून शारिरीक कष्टप्रद घडणार्‍या घटनांना अटकाव करण्यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांना बरोबर घेऊन गुणवरे व जावली येथील अनिष्ट प्रथा बंद करण्यामध्ये हिरीरीने पुढाकार घेऊन त्यात ते यशस्वी झाले होते. याबरोबरच ग्रामीण भागात दारुबंदीसाठी त्यांनी केलेला फलटण तालुक्यातील जिंती येथील यशस्वी लढा सर्वज्ञात होता. सामाजिक प्रबोधनाच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन आजअखेर विविध क्षेत्रात काम करीत होते.

विविधांगी अभ्यास करुन आत्मसात केलेले ज्ञान समाजासमोर निर्भयपणे मांडता यावे यासाठी त्यांनी एकता दर्शन नावाचे साप्ताहिक सुरु केले होते. या माध्यमातून अनेक प्रश्‍न सोडवित अल्पावधीत त्यांनी पत्रकारीतेमध्ये आपला ठसा उमटवला होता. पत्रकारितेबरोबर शहर व तालुक्यातील सामाजिक प्रश्‍नांसाठी आंदोलने करुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना चालना देण्याचे काम ते सातत्याने करत होते.

विविध सन्मानाची पदे त्यांनी आजवर भूषवली असून त्यामध्ये भारत सरकारच्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, दूरसंचार समितीचे सदस्य, मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे (ता.फलटण) ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदींचा समावेश आहे.

त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल सन 2005 चा सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती पुरस्कार, सन 2012 चा पत्रकार भूषण पुरस्कार, सन 2017 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सन 2018 साली दि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार, सन 2020 चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण पुरस्कार’ यांसह अनेक सन्मान आजवर प्राप्त झाले होते.

Spread the love