। लोकजागर । सातारा । दि. 23 जुलै 2025 ।
येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, दलित विकास महिला मंडळाच्या सचिव ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिला जाणारा यु.एन. पॉप्युलेशन ॲवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मावळा फौंडेशनतर्फे त्यांचा गुरुवार दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

ॲड. वर्षा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लिंग भेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडी विरोधात त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. या संघर्षाची दखल घेत त्यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे यु.एन. पॉप्युलेशन ॲवार्ड देऊन गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, जे.आर.डी टाटा यांच्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी हा पुरस्कार मिळाला. नुकताच त्यांना ११ जुलै रोजी न्यूयॉर्क येथे हा पुरस्कार देण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे हा पुरस्कार स्विकारताना उत्तम इंग्रजी येत असताना देखील त्यांनी मराठीमध्ये भाषण करुन मराठी जनांची मान अभिमानाने उंचावली या निमित्ताने मावळा फौंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे.

यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, दै. सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, दै. प्रभात निवासी संपादक श्रीकांत कात्रे, दै. लोकमत आवृत्तीप्रमुख हनुमंत पाटील, यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमास सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन मावळा फौंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत, सदस्य अनिल जठार, तुषार महामूलकर यांनी केले आहे.
