आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
| लोकजागर | फलटण | दि. ३० जुलै २०२५ |
सगुणामातानगर, मलठण (ता. फलटण) येथील राजेंद्र नारायणराव रणवरे (वय ५६) हे शनिवारी (दि. २६ जुलै) सकाळी सुमारास वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडून गेले होते. मात्र, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नसून ते बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

राजेंद्र रणवरे हे त्यांच्या वयस्कर आई प्रमिला (वय ८५) यांच्यासमवेत राहत होते. त्यांची मानसिक अवस्था काही काळापासून स्थिर नसल्याने त्यांच्यावर डॉ. खराडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गावातील रमाकांत कदम यांच्या वर्षश्राद्धासाठी जात असल्याचे सांगून घर सोडले; मात्र ते परतले नाहीत.
त्यांचा पुतण्या सुमित भोईटे (रा. आरडगाव) यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आणि विविध ठिकाणी नातेवाईक, परिचित यांच्याकडे शोध घेतला. शहरात व घराभोवतीचा परिसरही पालथा घालण्यात आला, परंतु रणवरे यांचा थांगपत्ता लागला नाही.

राजेंद्र रणवरे यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
वय: ५६ वर्षे, उंची: ५ फूट ११ इंच, रंग: गोरा, चेहरा: उभट, डोळे: काळे, अंगकाठी: मध्यम, केस: काळे, भाषा: मराठी, हिंदी व इंग्रजी. घरातून निघतांना कोणते कपडे परिधान केले होते, याची माहिती मिळालेली नाही.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद क्रमांक ००५८/२०२५ अन्वये तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी जर त्यांच्याविषयी कोणतीही माहिती आढळल्यास तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
किंवा खालील नंबरशी संपर्क करा – मो.नं.९८५०९९२२८८
