फलटणचा सत्तासंग्राम ! राजे गट व खासदार गटात राजकीय हालचालींना वेग

। लोकजागर । फलटण । दि. 5 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदा ही निवडणूक राजे गट विरुद्ध खासदार गट असा थेट सामना घडवणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन दिग्गजांच्या गटांमध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे.

नगरपरिषदेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एका अर्थाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सभेतून तर आमदार श्रीमंत रामराजे यांनी शनीनगर येथील सभेतून प्रचाराची सुरुवात याआधीच केली आहे.

या निवडणुकीत नगरपालिकेवर वर्चस्व मिळवणारा गटच तालुक्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याने होईल. १७ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप करण्यात येईल. त्यानंतर उमेदवार प्रचारयुद्धात उतरतील. २ डिसेंबरच्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान या पार्श्‍वभूमीवर राजे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी फलटण-पंढरपूर रोडवरील गोविंद मिल्क येथे होणार आहे. या मुलाखतींना आमदार श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभागांतील इच्छुकांना बोलावले आहे. राजे गटाच्या वतीने सर्व उमेदवार आणि समर्थकांना या बैठकींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, महायुतीच्या घटक पक्षांची रणनीती बैठक शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विंचुर्णी फार्महाऊस येथे होणार आहे. ही बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांनी बोलावली असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या तर्फे उमेदवारी आणि जागावाटपावर चर्चा होणार आहे.

शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रवेश, प्रभागनिहाय तिकीट वाटप, बंडखोरीचे संकेत आणि रणनीती या सर्व हालचालींमुळे फलटणमधील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही गटांचे प्रमुख नेते मैदानात उतरले असून, ही लढत आता प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यातच आणखीन भर म्हणजे नगराध्यक्षपद खुले असल्याने या पदासाठी दोन्ही प्रमुख गटांमधून कोण उमेदवार उतरवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहर व तालुक्यातील अन्य राजकीय घटक कोणती भूमिका घेणार? प्रमुख गटांसोबत निवडणूकीत उतरणार? की आणखीन एक तिसरा पर्याय फलटणकरांसाठी उभा करणार? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Spread the love