। लोकजागर । दुधेबावी । दि. २२ नोव्हेंबर २०२५ ।
फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील रहिवासी असलेले लक्ष्मण बापूराव खताळ यांनी मोठे यश संपादन केले आहे. त्यांची केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय वनस्पति सर्वेक्षण (BSI) या प्रमुख वैज्ञानिक संस्थेमध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ पदावर निवड झाली आहे. भारतीय वनस्पति सर्वेक्षण ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते, त्यामुळे या निवडीला विशेष महत्त्व आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या लक्ष्मण खताळ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, दुधेबावी येथे, माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फलटण येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथे झाले. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुणे येथील सर परशुराम कॉलेज येथे पूर्ण केले. या निवडीतून त्यांची जिद्द, चिकाटी आणि विज्ञान विषयातील तीव्र आवड स्पष्टपणे दिसून येते.
केंद्र सरकारच्या विविध वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये ‘कनिष्ठ शास्त्रज्ञ’ हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पदासाठी घेण्यात आलेल्या कठीण आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत (जी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे एप्रिल महिन्यात पार पडली) त्यांनी गुणवत्ता यादीत (मेरिटमध्ये) स्थान मिळवले. लक्ष्मण खताळ यांनी मिळवलेले हे यश दुधेबावी गावासाठी आणि फलटण तालुक्यासाठी भूषणावह आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी लक्ष्मण खताळ यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
