। लोकजागर । फलटण । दि. २३ डिसेंबर २०२५ ।
“प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन जगत असताना संयम, चिकाटी, प्रेम, अचूकता आणि व्यवसायातील सच्चेपण आचरणात आणल्यास, तीच आनंदी जीवनाची खरी गुरुकिल्ली ठरेल,” असे प्रतिपादन फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात ‘परशुराम पुरस्कार’ स्वीकारताना ते बोलत होते.
स्थानिक नवलबाई मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात यंदाचा ‘परशुराम पुरस्कार’ डॉ. प्रसाद जोशी व डॉ. प्रसन्न जोशी या जुळ्या भावंडांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. तसेच, दापोली येथील शिक्षण व मनसोपचार तज्ञ डॉ. धनश्री जोशी-दांडेकर यांना ‘शारदा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय श्रीनिवास दाते होते, तर नाशिक कार्यालयाचे कार्यवाह डॉ. सुहास भणगे, फलटण केंद्रप्रमुख विजय ताथवडकर आणि पुण्याच्या डॉ. संध्याताई भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. प्रसन्न जोशी यांनी आपल्या अमेरिकेतील अनुभवांचा उल्लेख करत तरुण पिढीला तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करण्याचे आणि परोपकाराची भावना जपण्याचे आवाहन केले. डॉ. धनश्री जोशी-दांडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, फलटणमध्ये झालेले संस्कार आणि मिळालेले सहकार्य यामुळेच हा सन्मान मिळाला असून, यामुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय श्रीनिवास दाते यांनी भगवान परशुराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत, योग्य सत्संग आणि गुरू मिळाल्यास जीवनाचे सोने होते, असे सांगितले. याच सोहळ्यात आंतरराष्ट्रीय रोबोट स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल निमिष विष्णूप्रद याचाही विशेष गौरव करण्यात आला.
केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. हा पुरस्कार कै. काशिनाथ वादे व कै. सत्यभामा लेले यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दिला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी दाणी व निखिल केसकर यांनी केले, तर आभार नंदकुमार केसकर यांनी मानले. या प्रसंगी डॉ. अवधूत गुळवणी, डॉ. हेमलता गुळवणी यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
