फलटण नगरपालिकेत मुस्लिम समाजाला निर्णयप्रक्रियेत संधी मिळावी; नेतृत्वाकडे समाजाची आग्रही मागणी

। लोकजागर । काळज / फलटण । वसीम इनामदार । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।

फलटणच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मुस्लिम समाजाचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेली सर्वधर्मसमभावाची परंपरा आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर समर्थपणे पुढे चालवत आहेत. या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मुस्लिम समाजाने नेहमीच महायुतीला खंबीर साथ दिली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजाच्या तीन उमेदवारांचा झालेला निसटता पराभव मुस्लिम समाजाच्या जिव्हारी लागला असून, आता निर्णयप्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अतूट विश्वास आणि विकासाची साथ

रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मुस्लिम समाजाच्या सुख-दु:खात, मग ती ईद असो वा दिवाळी, नेहमीच सहभाग नोंदवला आहे. समाजातील गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे. या विकासकामांच्या पोचपावतीमुळेच मुस्लिम समाजाने निवडणुकीत नाईक निंबाळकर गटाला मोठी साथ दिली. रणजितदादांनी मुस्लिम समाजावर असलेल्या प्रेमापोटी तीन उमेदवारांना संधी देऊन समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला, परंतु अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.

शहराच्या अर्थकारणात आणि सामाजिक ऐक्यात मोठे योगदान

फलटण शहराच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मुस्लिम समाजाचा वाटा मोठा आहे. छोटे व्यावसायिक, कारागीर, फळ-भाजी विक्रेते आणि सेवा क्षेत्रात काम करणारा हा कष्टकरी समाज शहराच्या अर्थचक्राला गती देत आहे. शांतताप्रिय आणि सामाजिक सलोखा जपणारा हा समाज नेहमीच कायद्याचा सन्मान करत सर्व समाजघटकांच्या सोबत उभा राहिला आहे.

प्रतिनिधित्वाचा प्रश्न आणि समाजाची मागणी

नगरपालिका ही शहराच्या विकासाची केंद्रबिंदू आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्णयप्रक्रियेत समाजाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. सध्या नगरपालिकेत निवडून आलेले प्रतिनिधी नसले, तरी मुस्लिम समाजातील अभ्यासू, शिक्षित आणि समाजभान असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय स्तरावर किंवा स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

समावेशक विकासासाठी संधीची गरज

“खऱ्या अर्थाने लोकशाही तेव्हाच सशक्त होते, जेव्हा प्रत्येक घटकाला समान सन्मान आणि संधी मिळते. मुस्लिम समाजाला निर्णयप्रक्रियेचा भाग बनवणे, हे फलटण शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल,” अशी भावना समाजातील जाणकार व्यक्त करत आहेत.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात, मुस्लिम समाजातील सेवाभावी नेतृत्वाला संधी मिळावी, जेणेकरून मंजूर झालेली विकासकामे तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवता येतील. नाईक निंबाळकर कुटुंब आणि आमदार सचिन पाटील यावर सकारात्मक विचार करतील, अशी आशा फलटण शहर मुस्लिम समाजाला आहे.

Spread the love