“कोकरे सरांच्या २५ वर्षांच्या साहित्य सेवेचे हे अनमोल विचार” – पानिपतकार विश्वास पाटील
। लोकजागर । सातारा/फलटण । दि. १५ जानेवारी २०२६ ।
साताऱ्यातील स्वराज्यविस्तारक शाहू महाराज साहित्यनगरीत पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फलटणचे सुपुत्र आणि ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्या ‘वैखरीचा जागर’ या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रकाशन मंचावर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अभिनेते प्रशांत दामले आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक भोईट यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
पुस्तकाचे प्रकाशन करताना संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “वैखरीचा जागर हे केवळ पुस्तक नसून कोकरे सरांच्या २५ वर्षांच्या खडतर साहित्य सेवेचे अनमोल संचित आहे.” माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी या पुस्तकातील कथाकथन, व्याख्यान आणि प्रबोधनात्मक लेखांमुळे वाचकांना नवी ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन केले. अभिनेते प्रशांत दामले यांनी पुस्तकातील वास्तव प्रसंग आणि संतांच्या शिकवणुकीचा वारसा ही एक ‘संस्काराची शिदोरी’ असल्याचे नमूद केले.
अस्सल ग्रामीण बोलीचा अखंड झरा
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रबोधनाचा वारसा कोकरे सर पुढे चालवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. संस्कृती प्रकाशनच्या सुनिता राजे पवार यांनी कोकरे सरांच्या महाराष्ट्रभर चालणाऱ्या भ्रमंतीचा आणि त्यांच्या लेखणीतून वाहणाऱ्या अस्सल ग्रामीण बोलीचा गौरव केला. कुलगुरू डॉ. अशोक भोईट यांनी हे पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘पंचनामा’ कथेने रसिकांना केले अंतर्मुख
प्रकाशन सोहळ्यानंतर प्रा. रवींद्र कोकरे यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘पंचनामा’ या कथेतून शेतकऱ्यांचे भयाण वास्तव आणि प्रशासनातील त्रुटींवर आपल्या खड्या सातारी आवाजात प्रहार केले. त्यांच्या बहारदार कथाकथनाने उपस्थित रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख केले. यावेळी फलटण येथील श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांकडून अभिनंदन
या यशोगाथेबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माळेगाव कारखान्याच्या व्हाईस चेअरमन संगिताताई कोकरे, सरपंच बाळासाहेब कोकरे यांच्यासह फलटणमधील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. कोकरे यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश जंगम यांनी केले, तर आभार घनश्याम पाटील यांनी मानले.
