रामराजेंचा अस्त करण्याची भाषा करणाऱ्यांना मतदारांनीच उत्तर दिले; फलटणच्या विजयानंतर संजीवराजेंचा विरोधकांवर घणाघात

शिवसेनेच्या ऐतिहासिक यशानंतर राजे गटाचा जल्लोष; कार्यकर्ते घडवण्याची आमची फॅक्टरी – संजीवराजे

। लोकजागर । फलटण । दि. १० फेब्रुवारी २०२६ ।

सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. “आम्ही अनेक वर्षांपासून या भागात काम करत आहोत. घाटावरच्या काही मंडळींनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अस्ताची भाषा केली होती, मात्र अशा कामाच्या माणसाचा अस्त कधीही होत नसतो. दुष्काळी भागाला रामराजेंच्या कृपेने मिळालेले पाणी आणि विकासकामांमुळेच जनतेने आम्हाला हे मोठे यश दिले आहे,” असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ५ जागा आणि पंचायत समितीच्या १६ पैकी ८ जागांवर विजय मिळवल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शरदराव कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, विराज खराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला एवढे मोठे यश मिळाले आहे. हा पक्ष तालुक्यासाठी नवा असतानाही जनतेने दाखवलेला विश्वास कौतुकास्पद आहे. या विजयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानले.

विरोधकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना संजीवराजे म्हणाले, “कार्यकर्ते निर्माण करण्याची आमची ‘फॅक्टरी’ आहे, तर काहींची मानसिकता केवळ कार्यकर्ते आयात करण्याची आहे. आमचे काही चांगले कार्यकर्ते त्यांनी ओढून घेतले, मात्र आता शिवसेनेची ताकद पाठीशी असल्याने आमचा कोणताही कार्यकर्ता कुठेही जाणार नाही. उलट, आम्ही नवीन दमाचे कार्यकर्ते ताकदीने उभे करून पक्ष अधिक विस्तारणार आहोत आणि तालुक्याचा विकास साध्य करणार आहोत.”

नगरपालिका निवडणुकीतील अपयशाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्यावेळी आपण ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे यश मिळाले नव्हते. मात्र, त्या निवडणुकीतील अपयशाची संपूर्ण भरपाई फलटणच्या जनतेने या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत करून दिली आहे. या विजयाचा मुख्य आधार हा सर्वसामान्य मतदार आणि निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता असल्याचे नमूद करत त्यांनी मतदारांचे आभार मानले.

Spread the love