आम्ही आता निम्म्याला निम्मे झालो; तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा आलेख चढता – रणजितसिंह नाईक निंबाळकर
। लोकजागर । फलटण । दि. १० फेब्रुवारी २०२६ ।
“पंचायत समितीच्या १६ पैकी ८ जागा जिंकून आम्ही मोठी मुसंडी मारली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या आमच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. आम्ही विधानसभा आणि नगरपालिका जिंकली असून, आता पंचायत समितीचा सभापतीही आमचाच असेल. जरी सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीद्वारे होणार असला, तरी दैव आणि फलटणचा विकास करण्यासाठी नशीब आमच्याच बाजूने राहील,” असा ठाम विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रणजितसिंह पुढे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत आमचा केवळ एक जिल्हा परिषद सदस्य होता, मात्र आता ही संख्या ४ वर पोहोचली आहे. तसेच पंचायत समितीचे ८ सदस्य निवडून आल्यामुळे आम्ही तालुक्यात आता ‘निम्म्याला निम्मे’ झालो आहोत. आमचा हा आलेख प्रगतीचा आणि विकासाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येणाऱ्या काळातील नियोजनाबाबत बोलताना ते म्हणाले की, पंचायत समितीत जर विरोधात बसावे लागले तर आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि जर आमचा सभापती झाला तर चांगले काम करू. विडणीसारखी काही जागा आम्ही अत्यंत निसटत्या मतांनी गमावली असली तरी एकूण निकालाने महायुतीला मोठी बळकटी दिली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते अजितदादांच्या निधनामुळे कोणताही विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही जनतेचे आभार मानले. “फलटण तालुक्याने परिवर्तनाचा जो निश्चय केला होता, त्याला या निवडणुकीतही मतदारांनी भाजप-राष्ट्रवादीला भरभरून प्रतिसाद देऊन साथ दिली आहे. तालुक्याने पंचायत समितीसाठी दोन्ही बाजूंना समान न्याय दिला असला, तरी सभापतीपदाची चिठ्ठी परमेश्वराच्या इच्छेने आमच्याच बाजूने निघेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
