। लोकजागर । फलटण । दि. १३ फेब्रुवारी २०२६ ।
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फलटण येथील शुक्रवार पेठेत स्थित असलेल्या ऐतिहासिक श्री माणकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा मुख्य उत्सव संपन्न होणार असून, या निमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त शिवभक्तांनी या मंगल सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री माणकेश्वर महादेव भक्त मंडळ आणि योद्धा ग्रुप, शनिनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उत्सवासाठी प्रमुख मान्यवर म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पप्पुभाई शेख, नगरसेवक विशाल तेली, नगरसेविका सौ.रुपालीताई जाधव या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत ‘लघुरुद्र महाअभिषेक’ पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दादामहाराज महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७:३० वाजता महाआरती संपन्न होईल, ज्यानंतर सायंकाळी ७:३० ते ९ या वेळेत ‘शिवरुद्र ढोल ताशा ध्वज पथक’ आपले वादन सादर करतील. रात्री ९:३० वाजता एकतारी भजनाच्या कार्यक्रमाने या दिवसाची सांगता होईल.
महाशिवरात्रीच्या मुख्य सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० नंतर भव्य ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे. फलटण शहर आणि परिसरातील सर्व शिवभक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
