माणकेश्वर मंदिरात लघुरुद्र आणि ढोल-ताशांचा गजरात रंगणार सोहळा; माळजाई, जबरेश्वर आणि नागेश्वर मंदिरातही जय्यत तयारी
। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२६ ।
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण फलटण शहर शिवभक्तीच्या लाटेत न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाले असून, शहरातील विविध पुरातन व ऐतिहासिक महादेव मंदिरांमध्ये उत्सवाची मोठी तयारी करण्यात आली आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त ‘हर हर महादेव’च्या निनादाने संपूर्ण शहर दुमदुमणार असून माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिर, श्री जबरेश्वर मंदिर, ऐतिहासिक श्री माणकेश्वर मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनांकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे.
शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक श्री माणकेश्वर महादेव मंदिरात यंदाही महाशिवरात्री उत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. श्री माणकेश्वर महादेव भक्त मंडळ आणि शनिनगर येथील योद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत ‘लघुरुद्र महाअभिषेक’ होईल. त्यानंतर दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि सायंकाळी ७:३० वाजता महाआरती संपन्न होईल. विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी ७:३० ते ९ या वेळेत ‘शिवरुद्र ढोल-ताशा ध्वज पथक’ आपल्या वादनाने आसमंत दणाणून सोडणार असून रात्री एकतारी भजनाने दिवसाची सांगता होईल. तर दुसऱ्या दिवशी, सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील अन्य मंदिरांमध्येही भक्तीमय वातावरण पाहायला मिळणार आहे. माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने दर्शन व प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री जबरेश्वर मंदिरात रविवारी सकाळी अभिषेक व महापूजेचे आयोजन केले असून सोमवारी महाप्रसादाचे वाटप केले जाईल. यासोबतच श्री नागेश्वर मंदिर आणि इतर सर्वच महादेव मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली असून, फलटणकर शिवभक्तांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
