। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२६ ।
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन (IDSA) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ‘महाविकास २०२६’ या राज्यस्तरीय परिषदेत फलटण तालुक्यातील काळज येथील सौ. साधना तुकाराम घाडगे यांना प्रतिष्ठेच्या ‘आद्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र हे देशातील डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठे मार्केट असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांत ज्या महिलांनी स्वयंरोजगाराद्वारे समाजात प्रेरणादायी बदल घडवला आहे, अशा राज्यातील केवळ १० महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा संचालित, ‘ओम साई’ लोकसंचालित साधन केंद्र फलटण निर्मित ‘कानिफनाथ स्वयंसहायता महिला बचत गट’ काळजच्या साधना घाडगे यांनी या बहुमानावर आपले नाव कोरले.
हा गौरव सोहळा अतिरिक्त मुख्य सचिव (अन्न व नागरी पुरवठा) अनिल डिग्गीकर, राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे सदस्य मुकेश शर्मा, जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती वंदना मिश्रा, ॲड. उदय वारुंजीकर, संदीप वाही आणि प्रांजल डॅनियल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. डायरेक्ट सेलिंग क्षेत्रात महाराष्ट्रात सुमारे १० लाख सक्रिय विक्रेते असून त्यात ४४ टक्के महिलांचा सहभाग आहे. अशा स्पर्धात्मक क्षेत्रात साधना घाडगे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वयंपूर्ण होत ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल फलटण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साधना घाडगे यांना हे यश मिळवण्यासाठी माविम साताऱ्याच्या जिल्हा समन्वय अधिकारी सौ. शोभा विलास बच्चे, विभागीय व्यवसाय सल्लागार सिद्धराम माशाळे, विभागीय सल्लागार विलास बच्चे, जिल्हा प्रकल्प सल्लागार अभिजीत काटकर आणि ओम साई लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ. शीला घाडगे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील बचत गटांच्या चळवळीला आणि महिला उद्योजकतेला मोठी उभारी मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
