फलटणच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी; हद्दवाढीसह शहर ‘अ’ वर्ग करण्याचा संकल्प

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती; नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत विकासकामांचा धडाका

। लोकजागर । फलटण । दि. मार्च २०२६ ।

फलटण शहराचा कायापालट करण्यासाठी आणि भविष्यात या शहराला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी नगरपरिषद, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत. यामध्ये नगरपरिषदेकडील २० कोटी आणि विविध योजनांमधील ८० कोटींच्या निधीचा समावेश असून, फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी व चौधरवाडी या गावांचा समावेश करून फलटण नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यासह पालिकेला ‘अ’ वर्गात नेण्याचा महत्त्वाचा संकल्प माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

फलटण नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच विविध विभागांचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उद्यान, रस्ते, अद्ययावत नाट्यगृह, तारांगण आणि सुसज्ज हॉस्पिटल यांसारखी कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, शहरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पार्किंग सुविधांवर भर दिला जाणार आहे. विशेषतः जुन्या सुपर मार्केटच्या जागी आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला.

शहरातील स्वच्छतेसाठी १० नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे, पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण, आणि दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र ८ ते ९ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दगडी पुलाजवळील नाल्याच्या कामासाठी साडेतीन कोटी आणि पाणी पुरवठा योजनेसाठी ८ कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठेकेदारांना कडक इशारा दिला की, विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्यास किंवा कामे रेंगाळल्यास संबंधित ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. फलटण शहराचा विकास हा जिल्हा मुख्यालयाला साजेसा असावा, याच उद्देशाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपरिषदेच्या सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.

बैठकीस नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुपर्णा सनी अहिवळे, रूपाली अमोल सस्ते, मिना काकडे, मोहिनी हेंद्रे, कुमारी सिद्धाली अनुप शहा आदी उपस्थित होते.

Spread the love