श्रीराम विद्याभवनमध्ये जागतिक महिला दिन ‘वेगळ्या आणि उपक्रमशील’ पद्धतीने साजरा; भारती पुजारी ठरल्या पैठणीच्या मानकरी!

विजेत्या महिलांचा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव; लांबलचक उखाणा स्पर्धा आणि माता पालकांशी मुक्त संवादाने वेधले लक्ष

। लोकजागर । फलटण । रविवार, दि. ८ मार्च २०२६ ।

८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी अत्यंत वेगळ्या आणि उपक्रमशील पद्धतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे महिला पालकांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, प्रश्नमंजुषा, चेंडू नेमबाजी, लांबलचक उखाणा आणि हनुमान नरसिंह अॅक्शन यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमधून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या भारती उदय पुजारी या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या शाळा समितीच्या अध्यक्ष अलका बेडकिहाळ, प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर चंदाताई जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. सुनिता निंबाळकर आणि एसबीआयच्या रूपालीताई काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भिवा जगताप आणि बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित माता पालकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले, ज्यातून महिलांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.

लांबलचक उखाणा स्पर्धा: या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘लांबलचक उखाणा’ ही स्पर्धा. या स्पर्धेतून उपस्थितांना मराठी संस्कृतीचे सौंदर्य दर्शन घडले. याशिवाय अचानक स्वतःजवळील वस्तू दाखवणे, हनुमान नरसिंह झटपट कृती यांसारख्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विविध स्पर्धांमधील विजेते:

  • प्रश्नमंजुषा: अंजली सागर शिंदे (प्रथम)
  • तळ्यात-मळ्यात: पूजा निलेश पालकर (प्रथम)
  • संगीत खुर्ची: प्रमिला धायगुडे (प्रथम)
  • ॲक्शन स्पर्धा: अर्चना अहिवळे (प्रथम)
  • चेंडू नेमबाजी: अनिता अर्जुन पवार (प्रथम)
  • उखाणा: भारती उदय पुजारी (प्रथम)

या विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २० महिलांमधून चिठ्ठ्यांद्वारे पाच भाग्यवान महिलांची निवड करून त्यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली निंबाळकर, विजया भोसले, हेमलता गुंजवटे, निलिमा मगदूम, शमीम शेख, निकिता कुलकर्णी, संतोषी हजारे, ज्योती शिंदे, पूजा जाधव आणि मीना मदने यांनी विशेष परिश्रम घेतले. दिपाली निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे फलटण परिसरात कौतुक होत आहे.

Spread the love