निर्भीड पत्रकारिता आणि साहित्याचा समृद्ध वारसा: प्रा. विकास शिंदे यांचा गौरवशाली प्रवास

। लोकजागर । विशेष लेख । हिंदुराव गायकवाड (सहसंपादक, समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क) ।

फलटणच्या सामाजिक आणि साहित्यिक भूमीत ज्या काही मोजक्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, त्यात प्रा. विकास शिंदे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक समाजाभिमुख आणि निर्भीड पत्रकार, संवेदनशील लेखक, कवी आणि सामाजिक चळवळींचे मार्गदर्शक अशा बहुआयामी पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे.

संस्कारांची शिदोरी आणि संघर्षाचा वारसा: प्रा. विकास शिंदे यांची जडणघडण मुळातच सामाजिक आणि साहित्यिक वातावरणात झाली. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे आणि साखरशाळा प्रकल्पाच्या जननी सुलेखा शिंदे यांच्या संस्कारांतून त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले. चळवळी, संघर्ष आणि आंदोलने त्यांनी बालपणापासून जवळून पाहिली आहेत. त्यामुळेच अन्यायाविरुद्ध बंड करून लढणारा एक निर्भीड पत्रकार म्हणून आज संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांची ओळख आहे.

शिक्षण आणि अध्यापन क्षेत्रातील योगदान: त्यांचे संपूर्ण शिक्षण फलटणमध्येच झाले. यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मराठी विषयातून पदव्युत्तर (M.A.) पदवी घेतली. पुढे शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड. आणि एम.एड. पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली. पाटण तालुक्यातील सणबुर येथील महाविद्यालयात त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे कार्यही केले. विशेष म्हणजे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मॅक्सिन बर्नसन यांच्यासोबत त्यांनी प्राथमिक शाळांवरील वाचन-लेखन आणि इंग्रजी सुधार प्रकल्पावर काम केले, ज्याचा त्यांच्या विचारांवर मोठा प्रभाव पडला.

बालवयापासून पत्रकारितेची ओढ: पत्रकारितेची आवड त्यांना उपजतच होती. वयाच्या अवघ्या १०-११ व्या वर्षी त्यांनी ‘दैनिक शिवसंदेश’साठी लेखन सुरू केले. त्यांच्यातील ठिणगी ओळखून कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि शिवसंदेशचे व्यासपीठ खुले करून दिले. पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विषयाची पदवी संपादन केली. गेल्या १५ वर्षांत त्यांनी साप्ताहिक लोकजागर, विचार संगम, फलटण अंजन, दैनिक स्थैर्य, एकतादर्शन अशा विविध माध्यमांतून समाजहिताचे लेखन केले आहे. त्यांना रवींद्र बेडकिहाळ, स्व. दिलीप रुद्रभटे, स्व. प्रा. रमेश आढाव अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले.

साहित्यिक झेप आणि ‘ज्ञानबोध’: ज्येष्ठ विचारवंत ग. प्र. प्रधान यांच्या सहवासात प्रा. विकास शिंदे यांच्यातील लेखकाला नवी दिशा मिळाली. प्रधान सरांच्या सूचनेवरून त्यांनी लिहिलेल्या पुस्तक परीक्षणांतून ‘ज्ञानबोध’ हे समीक्षात्मक पुस्तक आकाराला आले आणि लोकप्रिय झाले. यापूर्वी त्यांचा ‘वाळूचे घर’ हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला असून, ‘पहिल्या बाकावरची मुलं’ ही शिक्षणविषयक कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. फलटणमध्ये ‘साहित्य संवाद’ हे व्यासपीठ निर्माण करून त्यांनी नवोदित साहित्यिकांना हक्काची जागा मिळवून दिली आहे.

पुरोगामी विचार आणि सामाजिक एकता: फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे पत्रकार म्हणून प्रा. विकास शिंदे ओळखले जातात. ते स्वतः राजकारणात सक्रिय नसले, तरी सामाजिक एकता आणि बंधुता जपण्यासाठी त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणसाला माणूस’ म्हणून पाहणारा हा लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता आहे.

भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच नव्या पत्रकारांना मार्गदर्शन केले आहे. “पत्रकारिता ही सामाजिक बदलाचे शस्त्र आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी सातत्याने लिहित राहिले पाहिजे,” हा विचार ते प्रत्यक्ष कृतीतून जगत आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ लाख लाख शुभेच्छा!

Spread the love