सासवड-शिखर शिंगणापूर कावड यात्रेचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते शिवकावडीचे पूजन

जिंती नाका येथे शिवभक्तांची मोठी मांदियाळी; फलटण तालुक्यावर महादेवाचा कृपाशीर्वाद राहू देण्याची आमदार पाटील यांची प्रार्थना.

। लोकजागर । फलटण । २९ मार्च २०२६ ।

सासवड ते शिखर शिंगणापूर या मार्गावर मार्गस्थ होणाऱ्या संत शिवभक्त तेली भूतोजी महाराज यांच्या कावड यात्रेचे फलटणमध्ये आगमन झाले. शहराच्या जिंती नाका येथे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत या यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी श्री शिव कावडीचे यथोचित पूजन करून मनोभावे आरती केली.

याप्रसंगी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी, फलटण तालुक्यावर आणि येथील जनतेवर शिव शंभू महादेवाचा सदैव कृपाशीर्वाद राहो, अशी प्रार्थना चरणी केली. यात्रेनिमित्त जिंती नाका परिसर शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कावडीसोबत आलेल्या वारकरी आणि शिवभक्तांसाठी यावेळी विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले होते.

या स्वागत सोहळ्याप्रसंगी युवा नेते सुनील घोलप, रणजीत काशिद यांच्यासह परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. सासवडहून निघालेली ही कावड यात्रा परंपरेनुसार शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाली असून, ठिकठिकाणी या यात्रेचे भावपूर्ण स्वागत केले जात आहे.

Spread the love