सातारा जिल्ह्यातील ‘सर्वेश्री सामाजिक संस्थे’चा अनोखा उपक्रम; शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीसाठी करणार आर्थिक मदत

‘झाडे लावा, झाडे जगवा’ अभियानात शेतकऱ्यांना थेट खत आणि आर्थिक पाठबळ; ०.१ ते ०.५ हेक्टरपर्यंतच्या लागवडीला मिळणार संस्थात्मक सहकार्य.

। लोकजागर । फलटण । ३१ मार्च २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या ‘सर्वेश्री सामाजिक संस्था, सातारा’ या नोंदणीकृत संस्थेने जून ते जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा व ऑक्सिजन वाढवा’ या ब्रीदवाक्यानुसार, संस्थेने यंदाच्या पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी विशेष आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती सर्वेश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक खजिनदार बाळकृष्ण चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या उपक्रमांतर्गत, ०.१ हेक्टर ते ०.५ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रात सर्व प्रकारची फळझाडे लावू इच्छिणाऱ्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींना संस्थेमार्फत लागणाऱ्या खतासह लागवडीचा सर्व खर्च उचलला जाणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ फळझाडांना पाणी देणे आणि त्यांची राखण करणे ही जबाबदारी स्वीकारायची आहे. याशिवाय, सरकारी व निमसरकारी फॉरेस्ट विभागाच्या परवानगीने सर्व प्रकारच्या झाडांची लागवड आणि त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी स्वतः संस्था घेणार असून, त्यासाठी लोकनिधीतून निधी उभा केला जाणार आहे. राज्यातील आमदार, खासदार, व्यापारी, डॉक्टर, वकील आणि साखर कारखानदार यांच्यासह समस्त दानशूर व्यक्तींना या कार्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल महादेव बिडकर, उपाध्यक्ष महेश रोहिदास लाळगे, सचिव सौ. भारती विलास जगताप आणि खजिनदार बाळकृष्ण रामचंद्र चव्हाण यांनी केले आहे.

शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून, त्याला आर्थिक संकटातून आणि आत्महत्यांपासून वाचवण्यासाठी संस्थेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने लोकनिधीतून वेळोवेळी मदत करण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक घरामध्ये पाच ते दहा झाडे लावण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी महाराष्ट्र निसर्गसंपन्न, सुजलाम व सुफलाम करण्यासाठी या अभियानाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love