पुढील २५ वर्षे अजित पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही : खा. नितीन पाटील

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।

“गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात अनेक स्थित्यंतरे झाली.अपवाद वगळता राज्यात सर्वच पक्षांची सत्ता आली आणि गेलीही. मात्र शाहू,फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजकारण व राजकारण करत आहे.त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे.त्यामुळे पुढील २५ वर्षे अजित पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही”, असा विश्वास खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला.

फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने सभासद नोंदणी शुभारंभ, पक्ष प्रवेश आणि पक्ष कार्यकारिणी निवड कार्यक्रम प्रसंगी खासदार नितीन पाटील बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, महाराष्ट्र प्रदेश युवकचे उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी.के.पवार, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहूल निंबाळकर, अशोकशेठ सस्ते, नंदकुमार नाळे, पिंटू जगदाळे, बाळासाहेब खलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“अजित पवार यांच्या कामाच्या झपाट्याची ओळख संपूर्ण राज्यासह जिल्ह्याला आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील यात शंका नाही. शिर्डीच्या अधिवेशनात आपले नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सभासद नोंदणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम फलटणला होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरून जे आदेश येतील त्याप्रमाणे आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात किंबहुना प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ती पार पाडू”, अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी दिली.

गेल्या चार-पाच वर्षात राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण होते.त्यामुळे महायुतीला लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या.त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना साडेसात एचपीची वीज मोफत यासारख्या लोक उपयोगी योजना राबवल्याने विधानसभेला चांगले यश मिळाले. आताच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये अजित पवार यांनी विविध जनकल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. सचिन पाटील हे अजित पवार यांच्या विचारांचे आमदार असल्याने अजित पवार यांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये विविध विकास कामे होतील याबाबत फलटणकरंनी निश्चिंत राहावे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आता कामाला लागावे. तुमच्या आणि लोकांच्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी काय उपाय करावे लागतील यासाठी आम्ही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे तुमच्या पाठीशी आहोत”, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नितीन पाटील यांनी दिला.

“माझा प्रवेश झाल्यापासून राष्ट्रवादीचे काम प्रामाणिकपणे करत आलो आहे. यापुढे तालुक्यात पक्ष वाढवण्यासाठी ‘गाव तेथे शाखा’ हे अभियान राबण्याचे काम आम्ही करणार आहोत. यातून आम्ही राष्ट्रवादीचे दहा हजार सभासद पूर्ण करण्याचे उद्दिष्ट स्वीकारले आहे. ते एक महिन्यात पूर्ण करू”, असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.

“विधानसभा निवडणुकी दरम्यान अजित पवार यांनी फलटण तालुक्यातील तीन सभेतून जे शब्द दिले आहेत ते भविष्य काळात पूर्ण करतील. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याची जबाबदारी खा.नितीन काका पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे तालुकावार सभासद नोंदणी मेळाव्याचे आयोजन होत आहे. यातून अजित पवार यांच्या विचाराच्या शाखा गावागावात व्हाव्यात”, असे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सांगितले.

“काही लोक आपल्याकडे टेक्निकली आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाहीत”, अशी टिका आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता करत, “आमदार सचिन पाटील आणि तालुका कार्यकारिणी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्ष तालुक्यात ताकदीने उभा आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यापुढे आमदार पाटील आणि मी तालुक्यात राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी दहा हजार सभासद पूर्ण करणार आहोत”, अशी ग्वाही तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी यावेळी दिली.


प्रतिभाताई शिंदे यांनी आभार मानले. आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love