। लोकजागर । फलटण । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी जनसंपर्कावर भर दिला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि श्री. संदीप चोरमले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. विजयाचा आनंद पेढे वाटून साजरा करत, त्यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे-पाटील यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महायुतीने आपले स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. प्रभाग ११ मध्ये केवळ नगरसेवकच नव्हे, तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाही मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.
प्रभागातील नागरिकांनी या विजयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना नवनियुक्त नगरसेवकांनी सांगितले की, मतदारांनी जो कौल दिला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या आभार दौऱ्यात महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
