आजचे हेच विद्यार्थी देशाचे भविष्य घडवणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखात समारोप

। लोकजागर वृत्त । फलटण । २८ नोव्हेंबर २०२६ ।

आजचे हेच विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणार असून, विज्ञान आणि संशोधनाच्या अशा उपक्रमांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ठाम आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिले. सातारा जिल्हा परिषद सातारा, फलटण पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५, २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या ५४व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप समारंभ बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध वैज्ञानिक, पर्यावरणपूरक आणि एआयनिर्मित उपकरणांची सविस्तर माहिती घेत आमदार सचिन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित या विज्ञान मेळाव्याचे मनःपूर्वक कौतुक केले.

सकाळच्या सत्रात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त शिक्षण तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग अभियंता युवराज लक्ष्मण गायकवाड यांचे ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनातील भविष्यातील मोठ्या संधी’ या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून बहुमोल व्याख्यान झाले. बोबडे पी. एच. यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली, तर वाणिज्य विभाग प्रमुख तांबोळी ए. एस. यांनी आभार मानले, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. दुपारच्या सत्रात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश चिवटे, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, फलटण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, वनिताताई आढाव, सचिन अभंग, कारंडे, संजय पवार, नगरसेवक संदीप चोरमले, किरण राऊत, पंकज पवार, गटविकास अधिकारी ए. एम. घावटे, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, बीआरसी तालुका समन्वयक दमयंती कुंभार आणि केंद्रप्रमुख जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. समारोपाच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांनी तीन दिवस सुरू असलेल्या विज्ञान मेळाव्यामागचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला.

या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील १२४ प्राथमिक आणि ४८ माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी तसेच १० शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. लहान गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा बरड, द्वितीय क्रमांक वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तरडगाव आणि तृतीय क्रमांक पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय कुरवली यांनी पटकावला, तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक सुवीर सुदर्शन फडे (मुधोजी हायस्कूल फलटण), द्वितीय क्रमांक विघ्नेश दत्तात्रय भोईटे (जानाई हायस्कूल राजाळे) आणि तृतीय क्रमांक ध्रुव अनिल देशमुख (यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण) यांनी यश मिळवले. शिक्षक गटात प्राथमिकमधून जिल्हा परिषद शाळा जाधववाडी आणि माध्यमिकमधून यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांनी लक्षवेधी विज्ञान प्रयोग सादर करत पारितोषिक पटकावले. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांनी सहभागी व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परीक्षक संतोष ठोंबरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी मांडलेल्या वैज्ञानिक उपकरणांचे परीक्षण करताना मिळालेल्या सखोल उत्तरांचे कौतुक केले.

विज्ञान प्रदर्शनांतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि विज्ञान उपकरण स्पर्धेत लहान व मोठ्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, तसेच सहभागी सर्व शाळांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ५४व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंचायत समिती फलटण शिक्षण विभागाने प्राचार्या गायकवाड एन. एम., उपप्राचार्य घनवट पी. डी., सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले. समारोप कार्यक्रमाच्या स्वागत गीतास वाघ जी. बी. आणि अमर पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन व आभार यादव एस. डी., राऊत एस. एन., तगारे एस. एम. आणि सुजाता पवार यांनी मानले. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love