मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेतून शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहतुकीचा मार्ग होणार सुकर; प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद.
। लोकजागर वृत्त । फलटण । २७ नोव्हेंबर २०२६ ।
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत फलटण तालुक्यातील कांबळेश्वर आणि मठाचीवाडी येथील महत्त्वाच्या पाणंद रस्त्यांच्या सुधारणा कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मौजे कांबळेश्वर (ता. फलटण) येथील रेल्वे लाईन ते वाघ वस्ती पाणंद रस्ता सुधारणा करणे आणि मौजे मठाचीवाडी (ता. फलटण) येथील कदम वस्ती ते महादेव मंदिर मार्गे शेलार मळा रस्ता सुधारणा करणे या दोन महत्त्वाकांक्षी विकासकामांचे विधिवत भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पावसाळ्यातील आणि दैनंदिन वाहतुकीची मोठी गैरसोय दूर होणार असल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन्ही गावांमध्ये पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत अमरसिंह नाईक निंबाळकर, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, नगरसेवक रोहित नागटिळे आणि जयकुमार शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनाचे अधिकारी व दोन्ही गावांतील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त उपस्थितीत झालेल्या या भूमिपूजनामुळे कामांना वेग मिळणार असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
