। लोकजागर वृत्त । सातारा/फलटण । २७ नोव्हेंबर २०२६ ।
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रश्नांसंदर्भात त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी फलटणचे नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
या बैठकीत खंडाळा औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक ३ मधील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे, लोणंद औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण, कोरेगाव तालुक्यातील मौजे तळवडे येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करणे, तसेच फलटण येथील अतिरिक्त एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
याशिवाय फलटण औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी-१ मधून नांदल गावातील शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्नही यावेळी मांडण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, नवीन उद्योगांची उभारणी आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हे विषय महत्त्वाचे मानले जात आहेत. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत आशा निर्माण झाली आहे.
