साताऱ्याच्या आकाशी झेपावला साहित्य संमेलनाचा ‘आकाश फुगा’; ९९ व्या संमेलनाच्या तयारीने घेतला वेग

। लोकजागर । सातारा । दि. २९ डिसेंबर २०२५ ।

साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि नाव असलेला भव्य ‘आकाश फुगा’ शाहू स्टेडियमवरून आकाशात सोडण्यात आला. ज्याप्रमाणे हा फुगा आकाशात उंच भरारी घेत आहे, त्याचप्रमाणे साताऱ्याचे हे संमेलन गुणवत्तेची नवी उंची गाठेल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते हा फुगा हवेत सोडण्यात आला.

सातारकरांच्या नजरेत आता संमेलनाचा उत्साह हा आकाश फुगा सातारा शहराच्या कोणत्याही भागातून सहज दिसू शकणार आहे. त्यामुळे संमेलनाचे नाव आणि बोधचिन्ह सतत नागरिकांच्या नजरेसमोर राहील. या उपक्रमामुळे संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मोहिते यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. निवडणुकीतील त्यांच्या विक्रमी यशाप्रमाणेच हे शतकपूर्व संमेलनही यशस्वी होईल, अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली.

वैचारिक गुढी उभी राहणार महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या संमेलनाच्या माध्यमातून विचारांची गुढी या फुग्याप्रमाणेच उंच जाईल. यंदाच्या संमेलनात केवळ वैचारिक देवाणघेवाणच नाही, तर गर्दी आणि पुस्तक विक्रीचेही जुने सर्व विक्रम मोडीत निघतील. सातारा शहर या ऐतिहासिक संमेलनासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.

तयारीचा धडाका सुरू संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन आणि महामंडळ जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. या सोहळ्याला महामंडळाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संमेलनस्थळाच्या कामाला मोठी गती मिळाली असून, साहित्यप्रेमींमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Spread the love