। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय व्हिडिओ ॲनिमेशन स्पर्धेत फलटण तालुक्यातील धुळदेव येथील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयाचे उपशिक्षक श्री. सचिन अभंग यांनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. सांगली येथे पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कल्पकतेची आणि तांत्रिक कौशल्याची छाप पाडली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शालेय शिक्षण अधिक रंजक आणि तंत्रस्नेही व्हावे, या उद्देशाने SCERT मार्फत अधिकारी आणि शिक्षकांसाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन अभंग यांनी शैक्षणिक संकल्पनांना ॲनिमेशनच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे मांडल्याने त्यांच्या व्हिडिओची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आली. ग्रामीण भागातील शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनात कशा प्रकारे क्रांती घडवू शकतात, याचा आदर्शच अभंग यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या यशामुळे धुळदेव परिसरासह फलटण तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वसंतराव मोरे, मंत्रालयाचे अवर सचिव श्री. धीरज अभंग, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटीचे सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही ते आपल्या कौशल्याच्या जोरावर यश मिळवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सचिन अभंग यांच्या या कामगिरीचे फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे कौतुक होत आहे.
