। लोकजागर । पुणे । दि. १ मार्च २०२६ ।
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्याचा ऐतिहासिक शनिवारवाडा आणि लालमहाल परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिवकालीन वातावरणाचा जिवंत अनुभव देणाऱ्या ऐतिहासिक देखाव्यांसह यंदाचा शिवजयंती रथोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात, स्वराज्यासाठी देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या वीर शिलेदारांचा चित्तवेधक ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला, ज्याने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
या रथोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे व उपजिल्हाधिकारी मधुसुदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुणे, कोरेगाव, चिंचनेर, आंबेवाडी, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि बीड यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून बर्गे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने एकत्र आले होते. केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या वतीने मुळशी तालुक्यातील गोशाळेला ५ हजार १ रुपयांचा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी, परिवारातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहावी आणि शिक्षण, शेती व व्यवसायात प्रगतशील व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. इतिहास अभ्यासक पांडुरंग सुतार व पोपटराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संवर्धन आणि अभ्यासाचे विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्यास सहकार तज्ज्ञ ॲड. अजित बोराडे, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, नगरसेवक प्रा. एस. एस. बर्गे, ॲड. चंद्रशेखर बर्गे यांच्यासह एस. एस. बर्गे सर, दिनेश आप्पा बर्गे, युवराज बर्गे, शिरीष बर्गे, अमरसिंह बर्गे आणि समस्त बर्गे सरनौबत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक कार्याचा सुरेख संगम या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
