सातारा जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

। लोकजागर । सातारा । दि. १० मार्च २०२६ ।

मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन आणि गॅस पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

गॅस बुकिंगच्या नियमात महत्त्वाचे बदल: गॅस कंपन्यांनी आता ऑनलाइन प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यानुसार, ग्राहकांना पहिला सिलेंडर घेतल्यापासून २६ दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही. नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून २५ दिवसांनंतरच नवीन बुकिंग स्वीकारले जाणार आहे. हे बदल थेट कंपनी स्तरावरून करण्यात आले असल्याने नागरिकांनी गॅस वितरक किंवा कर्मचाऱ्यांशी अकारण वाद घालू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी ‘दक्षता पथके’ तैनात: युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवणारी इंधन टंचाई आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ‘दक्षता पथके’ (Flying Squads) तैनात केली आहेत. हे पथक हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक ठिकाणी अचानक छापे टाकून घरगुती गॅसचा वापर होत असल्यास सिलेंडर जप्त करण्याची कारवाई करेल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा गैरवापर करणाऱ्यांवर ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’ंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

नागरिकांना आवाहन: जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याने पेट्रोल पंपावर रांगा लावू नयेत. तसेच गॅसची बचत करण्यासाठी सौर ऊर्जा किंवा विद्युत उपकरणांचा पर्याय वापरावा. जर कोठे गॅसचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्रीमती राजमाने यांनी केले आहे.

Spread the love