साताऱ्यातील अश्वमेध ग्रंथालयातर्फे घोषणा; २३ ऑगस्ट रोजी धनंजय तडवळकर व ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.
। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑगस्ट २०२६ ।
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखूणा’ या ललितसंग्रहाची सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने भास्कराव माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या “राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कारासाठी” निवड झाली आहे. अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली.
गेल्या १४ वर्षांपासून राज्यस्तरीय “अक्षर गौरव साहित्य पुरस्कार”, “अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार” व “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार” अशा विविध साहित्य पुरस्कारांचे अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने आयोजन करण्यात येते. या पुरस्कारांतर्गत सातारा जिल्हा लेखकांसाठी दिल्या जाणाऱ्या “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार-२०२५” करीता अशोक शिंदे यांच्या या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.
रविवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी सातारा येथे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व गझलकार धनंजय तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचे समारंभाचे संयोजक व संस्थेचे संस्थापक रवींद्र भारती यांनी सांगितले.
अशोक शिंदे यांच्या या ग्रंथास हा चौथा पुरस्कार प्राप्त झाला असून, यापूर्वी या ग्रंथास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांचा ‘शिविम साहित्य पुरस्कार – २०२५’, ॲग्रो न्यूज परिवार ट्रस्ट, फलटण यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार – २०२५’ व शिवाबाबा वाघ स्मृती प्रतिष्ठान, नाशिक यांचा ‘शिवाजी शहादू वाघ स्मृती पुरस्कार – २०२५’ हे राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले आहेत.
‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ हा ललित लेखांचा संग्रह लोकजीवनातील साधनांचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दर्शन घडवणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण जीवनातील नामशेष होत चाललेल्या साधनांचे मोल लेखकाने अधोरेखित केले आहे. एकूण अठरा ललित लेख असलेल्या या ग्रंथात नांगर, मोट, पोहरा, कावड, जाते, करंडा, काठवट, माळा, वावडी, कणगी, गंज, चोपणी, सूप, कंदील, अडकित्ता, बाज, गोधडी आणि आगळ या परंपरागत साधनांचे प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंतचे लोकवैभव ललितरम्य भाषेत शब्दबद्ध केले आहे.
या ग्रंथात सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गाव-शेती चित्रित झाली असल्याने तत्कालीन व नववाचक, समीक्षक व परीक्षक यांच्या पसंतीला हा ग्रंथ उतरत आहे. अशोक शिंदे यांच्या या ग्रंथास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मराठी साहित्यिक तथा समीक्षक श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना तर मराठी साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे.
या पुरस्काराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अशोक शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एच. कदम व सर्व सहकारी शिक्षक याशिवाय इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
