१२५ हून अधिक देशांतील २५० हून अधिक युवा होणार सहभागी; भारतामधून निवड झालेल्या दोन प्रतिनिधींमध्ये नगरसेविका सिद्धाली शहा यांचा समावेश
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ नोव्हेंबर २०२६ ।
फलटण नगरपरिषदेच्या तरुण व तडफदार नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या कर्तृत्वाचा आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भरीव कार्याचा डंका आता पुन्हा एकदा थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजणार आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथील प्रतिष्ठित हॉटेल एमओए बर्लिन येथे आगामी ११ ते १४ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा जागतिक ‘युथ ॲक्शन समिट २०२७’ (Youth Action Summit 2027) मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील १२५ हून अधिक देशांतून २५० हून अधिक तरुण प्रतिनिधी सहभागी होणार असून, संपूर्ण भारतामधून निवड झालेल्या केवळ दोन युवा प्रतिनिधींपैकी एक म्हणून फलटणच्या सिद्धाली शहा यांची निवड झाली आहे. सेंटर फॉर डिप्लोमॅटिक ॲडव्हान्समेंट (CDA) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद जगभरातील तरुण नेते, व्यावसायिक, धोरणकर्ते, संशोधक, मुत्सद्दी आणि उद्योजकांना एकत्र आणणारा एक अत्यंत प्रभावशाली जागतिक मंच आहे.
युवा नेतृत्व, सार्वजनिक धोरण, राजनैतिक घडामोडी, हवामान कृती, शांतता प्रस्थापित करणे, डिजिटल प्रशासन आणि शाश्वत विकास यांसारख्या प्रमुख जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले जाते. या जागतिक व्यासपीठावर नगरसेविका सिद्धाली शहा या ‘युथ डेलिगेट’ (Youth Delegate) म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांना परिषदेमध्ये विशेष वक्ता म्हणून आपले विचार मांडण्याची बहुमूल्य संधी मिळणार आहे. या चार दिवसीय उच्चस्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्य सत्रांसह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील परिसंवाद, परस्परसंवादी कार्यशाळा, नेतृत्व विकास उपक्रम आणि नेटवर्किंग मंचांचा समावेश असणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांची निवड झाल्यामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या वाटचालीत नगरसेविका सिद्धाली शहा यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे.
