फटाका स्टॉल परवान्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत

विहित अटींचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे दुकान सील करून गुन्हा नोंदविण्याचा इशारा

। लोकजागर वृत्त । फलटण । २२ ऑक्टोबर २०२६ ।

देशभरात यंदा ५ नोव्हेंबर २०२६ पासून दीपावली उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार असून, या सणानिमित्त लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांकडून विविध प्रकारच्या आवाज करणाऱ्या व आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. दरम्यान, नियमांनुसार फटाक्यांची विक्री करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. परवान्याविना किंवा निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र व्यवसाय करणाऱ्या अथवा विहित अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या स्टॉलधारकांवर संबंधित पोलिस स्टेशनमार्फत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र आणि परिपूर्ण कागदपत्रांसह फटाका स्टॉलसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून, या दिनांकानंतर आलेले किंवा या दिनांकापूर्वी त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या अर्जांचा परवान्यासाठी कोणताही विचार केला जाणार नाही, अशी सक्त सूचना फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

याबाबत तहसीलदार अभिजीत जाधव यांनी नमूद केले आहे की, फलटण तालुक्यामध्ये असा तात्पुरता फटाका स्टॉल परवाना मिळवण्यासाठी पोलीस निरीक्षक (फलटण शहर, फलटण ग्रामीण व लोणंद) यांच्याकडील ना हरकत प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार फलटण यांच्यामार्फत विहित अटी व शर्ती घालून परवाना दिला जातो. फलटण शहरामध्ये नगरपालिकेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी बिनशेती जागेमध्येच फटाका विक्री करणे बंधनकारक असून, प्रत्येक स्टॉलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक साहित्य ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

परवान्याविना किंवा निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र व्यवसाय करणाऱ्या अथवा विहित अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या स्टॉलधारकांवर संबंधित पोलिस स्टेशनमार्फत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र आणि परिपूर्ण कागदपत्रांसह फटाका स्टॉलसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून, या दिनांकानंतर आलेले किंवा या दिनांकापूर्वी त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या अर्जांचा परवान्यासाठी कोणताही विचार केला जाणार नाही, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. सर्व इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करून परवाना प्राप्त करावा आणि परवाना मिळाल्यानंतर त्यामधील सर्व अटी व शर्तींचे कटाक्षाने पालन करून परवान्याची प्रत दुकानात सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावावी, तसेच दुकानात अग्निशमन यंत्रे आवर्जून उपलब्ध ठेवावीत, असे आवाहन तहसीलदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही व्यक्तीने रितसर परवाना घेतल्याशिवाय अथवा ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे फटाके जप्त करून दुकान सील केले जाईल आणि संबंधितांवर तातडीने गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. असा कोणताही बेकायदेशीर प्रकार सुजाण नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी त्याची तात्काळ सूचना तहसीलदार कार्यालय अथवा फलटण शहर, फलटण ग्रामीण व लोणंद पोलीस स्टेशनला द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिकांनी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन दिवाळी साजरी करावी आणि यादरम्यान कमीत कमी ध्वनी व वायू प्रदूषण होईल तसेच कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love