आकर्षक आरास, विद्युत रोषणाई, दांडिया आणि महिला मंडळांच्या भजनाने मंदिर परिसर दुमदुमला; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न.
। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑक्टोबर २०२६ ।
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला नवरात्र व दसरा महोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवानिमित्त माळजाई देवी मंदिराची आकर्षक सजावट, देवीची मनमोहक आरास, परिसरातील स्वच्छता, आकर्षक विद्युत रोषणाई आणि दुर्गादेवीचा देखणा मूर्तिरूपातील देखावा यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. नऊ दिवस चाललेल्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना महिला भाविकांसह फलटणकर नागरिकांचा लक्षणीय व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सकाळी माळजाई देवीचा विधिवत अभिषेक, सकाळी व सायंकाळी महाआरती, तसेच दुपारच्या सत्रात विविध महिला मंडळांच्या वतीने भजन, कीर्तन आणि श्रीसूक्त पठण यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात आयोजित दांडिया कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांसाठी आयोजित विविध उपक्रमांमुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली.
महोत्सवाच्या विविध दिवशी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सदगुरु समूहाचे दिलीपसिंह भोसले व कुटुंबीय, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, फलटण पत्रकार संघाचे सर्व सन्मानीय सदस्य, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत रसाळ, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक आणि महिला कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला विशेष प्रतिष्ठा लाभली असून, देवीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित राहत होते. याशिवाय महोत्सवाच्या कालावधीत अर्जुनराव घाडगे, महेश गरवालीया, प्रमोद निंबाळकर, नितीन निकम, विजयकुमार पाटील, सचिन सूर्यवंशी-बेडके, दिलीपराव शिंदे, विक्रम झांजुर्णे, संदीप जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध दिवशी देवीच्या अभिषेकाचा लाभ घेतला.
निसर्गसंपन्न व धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या महोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित दसरा महोत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. फलटण नगरीचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पारंपरिक रथ राजवाड्यातून माळजाई मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना आपट्याची पाने म्हणजेच सोन्याचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले, या मंगलमय सोहळ्याने दसरा महोत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली. लायन्स क्लब फलटण परिवारातील सदस्यांनी आणि माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट, विद्युत रोषणाई, भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन यामध्ये सर्वांनी मोलाचे योगदान दिले.
