व्याख्यान, कथाकथन आणि लेखकांच्या सत्काराने नांदी व यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
। लोकजागर वृत्त । फलटण । २६ नोव्हेंबर २०२६ ।
‘‘शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिष्ठेची पवित्र गाथा आहे. शिवरायांचे चारित्र्य हा त्यांच्या चरित्रातील असामान्य गुण होता. कट्टर शत्रू असलेल्या औरंगजेबानेही त्यांच्या उत्तम चारित्र्याचा गौरव मुगल दरबारात केला होता. शिवरायांच्या या राष्ट्रीय चारित्र्याची पेरणी उद्योन्मुख साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून करावी’’, असे विचार शिवव्याख्याते आणि इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके (ईश्वरपूर) यांनी व्यक्त केले.
येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी नांदी साहित्य संमेलन व थोर नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 15 वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन श्री सद्गुरु उद्योग समूहाच्या महाराजा आयकॉन सभागृहात पार पडले. या संमेलनाच्या समारोप सत्रात ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ या विषयावरील आपल्या व्याख्यानात प्रा.घोडके बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.रविंद्र कोकरे (फलटण), प्रा.हिम्मत पाटील (नागठाणे) उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बावडेकर यांच्यातील एका ऐतिहासिक प्रसंगाचा दाखल देवून प्रा.घोडके म्हणाले, ‘‘लेखणीचे मोल शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितले होते. हे मोल लक्षात घेवून साहित्यिकांनी सकस साहित्य देण्याचा प्रयत्न करावा. शिवचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. तो वारसा पुढच्या पिढीत संक्रमीत झाला पाहिजे. जीवनाचे यशस्वीपण विचारांवर अवलंबून असते. आपल्याला चांगला मित्र असणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुस्तकाला आपला मित्र बनवा’’, असे सांगून ‘‘येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा साहित्याची उपासना करुन नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देत आहे हे अभिनंदनीय आहे’’, असे गौरवोद्गारही प्रा.घोडके यांनी यावेळी काढले.
यावेळी प्रा. हिम्मत पाटील यांनी हसू आणि आसू मिश्रीत आपली ‘माती’ ही कथा तर प्रा. रविंद्र कोकरे यांनी अंधश्रद्धेच्या कुप्रथेवर बोट ठेवणारी ‘थापणूक’ ही कथा आपल्या ग्रामीण ढंगात सादर केली. त्याला उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळाली.
संमेलनाचे उद्घाटक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार व संमेलनाध्यक्ष, चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख यांच्या हस्ते फलटण शहर व तालुक्यातील स्थशनिक लेखकांच्या सत्काराने संमेलनाचा समारोप झाला. संमेलनास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
