नितीन गडकरी यांना ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’; ९ मे रोजी वाईत श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते वितरण

। लोकजागर । वाई । ५ मे २०२६ ।

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईंज या कारखान्याचे संस्थापक, देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा मानाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ भारताचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. साखर उद्योगाचे स्थैर्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि स्वच्छ इंधनाचा प्रसार या त्रिसूत्रीवर दूरदृष्टीने काम केल्याबद्दल गडकरी यांचा हा गौरव केला जाणार आहे.

हा सोहळा महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन ना. श्री. मकरंद जाधव-पाटील हे असणार आहेत.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खा. श्री. नितीन जाधव-पाटील उपस्थित राहणार आहेत.

हा गौरव सोहळा शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ‘कॉलनी ग्राउंड, किसनवीरनगर, ता. वाई, जि. सातारा’ येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, संचालक मंडळ आणि किसन वीर साखर कारखाना परिवाराने केले आहे.

Spread the love