‘यशवंत विचार’ राज्यातील सर्वांना नव्याने कळणे गरजेचे : धैर्यशील देशमुख

फलटणमध्ये १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन व नांदी संमेलन उत्साहात

। लोकजागर वृत्त । फलटण । २६ नोव्हेंबर २०२६ ।

‘महाराष्ट्राचे खरे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी दिलेला विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे परंतु आज समाज व राज्यकर्ते त्यांच्या विचारापासून परावृत्त होत आहेत. समाजात समानतेची भावना रुजवणे महत्त्वाचे आहे आणि याकरिता ‘यशवंत विचार’ राज्यातील सर्वांना नव्याने कळले पाहिजेत’’, असे मत चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष तथा 15 व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष धैर्यशील देशमुख यांनी व्यक्त केले.

येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी नांदी साहित्य संमेलन व थोर नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 15 वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन श्री सद्गुरु उद्योग समूहाच्या महाराजा आयकॉन सभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन धैर्यशील देशमुख बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार, फलटणच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.

धैर्यशील देशमुख पुढे म्हणाले, ‘‘आज समाजवादाच्या नावाखाली जातीयवादी प्रवृत्ती वाढतानाचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. संतांना, महापुरुषांना एका विशिष्ठ जातीच्या चौकटीत बंद करुन ठेवले जात आहे. अशा प्रकारे जर थोर व्यक्तींच्या वाटण्या झाल्या तर देशात सामाजिक क्रांती कधीच होणार नाही. त्यामुळे हे प्रकार टाळून सर्वांनी एकत्रित राहून काम करणे गरजेचे आहे. मराठी ही आपली लोकभाषा तर इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा आहे. आज लोकभाषेवर ज्ञानभाषेचे आक्रमण झाले आहे’’, असे स्पष्ट करुन ‘‘प्रगल्भ मराठीसाठी सर्वांकडून प्रयत्न व्हावेत’’ अशी अपेक्षाही यावेळी धैर्यशील देशमुख यांनी व्यक्त केली.

‘‘विकासाचा डांगोरा पिटला जातो पण सर्वसामान्यांपर्यंत तो पोचतो कां? हा खरा प्रश्‍न आहे. शेतीचा विकास अनेक शतके थांबलेला आहे. शेतकरी हा आर्थिक विवंचनेत मोठ्या प्रमाणात असून तकलादू कर्जमाफी त्याचे कल्याण करु शकत नाही. यशवंतराव चव्हाणांचे साहित्यिक योगदान महान आहे. मात्र साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी त्यांनी सुरु केलेल्या संस्थांवर सदस्य निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. वास्तविक या संस्थांना स्वायत्तता आवश्यक आहे’’, अशा शब्दात व्यवस्थेवर बोट ठेवून ‘‘रविंद्र बेडकिहाळ यांनी केलेल्या मागणीनुसार यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथे स्मारक होण्यासाठी आणि यशवंतराव चव्हाणांच्या नावे साहित्य अकादमी सुरु होण्यासाठी आपण या संमेलनात ठराव करुन तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवूया’’, असेही धैर्यशील देशमुख यांनी आपल्या भाषणात आवर्जून आवाहन केले.

संमेलन उद्घाटन प्रसाद मिरासदार म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती जागवताना त्यांची जडण-घडण विचारात घेणे गरजेचे आहे. सर्व मतप्रवाहांचा सुरेख संगम असलेल्या या व्यक्तीमत्त्वाचे साहित्य प्रत्येकासाठी वाचनीय असून भहाराष्ट्राच्या विकासाचा मूलगामी विचार त्यांनी मांडला आहे. दि. 27 ते 30 जानेवारी 2027 दरम्यान पुण्यात होत असलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांना समाविष्ट करण्यासाठी नांदी संमेलन होत आहे. 100 वे संमेलन आपल्याला वैचारिकदृष्ट्या समृद्ध पार पाडायचे असून या संमेलनात सर्व साहित्याचा संगम दिसला तर ती यशवंतरावांना खरी आदरांजली ठरेल तसेच मराठी भाषेला पुढे नेणशरी ऐतिहासिक घटना ठरेल.’’

सौ.प्रियदर्शनी भोसले म्हणाल्या, ‘‘मराठी भाषा टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. लहान वयापासून मुलांना वाचनाची सवय निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ज्येष्ठांनी मराठी साहित्य आपल्या नातवंडांपर्यंत न्यावे. मराठी संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. फलटणमधील लेखकांची पुस्तके अभिमानास्पद असून मराठी साहित्य उत्कृष्ठ आहे आणि ते उत्कृष्ठच राहणार’’ असा विश्‍वास व्यक्त करुन, ‘‘फलटण शहरात नव्याने सांस्कृतिक भवन, ग्रंथालय, कलादालन आणि वस्तू संग्रहालय निर्मीतीसाठी प्रयत्न केले जातील’’, असेही सौ.भोसले यांनी स्पष्ट केले.

डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके म्हणाले, ‘’यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कार्यरत आहे. यशवंतरावांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचा विचार कधीही पुसला जाणार नाही. साहित्य चळवळ रुजली पाहिजे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.’’

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहताना देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक आजही नाही ही मोठी शोकांतिका आहे. यशवंरावांच्या विचारांचे बोट सोडल्याने महाराष्ट्रातील राजकारणाची पिछेहाट झाली आहे. फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थानात रुजवलेली साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून करत असून विविध विचारांची मांदीयाळी देण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनातून होत असतो’’, असे सांगून ‘‘प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दीनिमित्त फलटणमध्ये मध्यवर्ती ठिकाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावे सभागृह व मध्यवर्ती ग्रंथालय, कलादालन व्हावे अशी अपेक्षाही बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे पुरस्कृत स्व.सुलेखाताई शिंदे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने धुमाळवाडी (ता.फलटण) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभाताई यशवंत कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी वर्षानिमित्त म.सा.प.फलटण शाखा आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने प्रसारीत करण्यात आलेल्या माहितीपटाचे प्रक्षेपणही यावेळी करण्यात आले. रणजितसिंह भोसले यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष धैर्यशील देशमुख यांचा तर डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते प्रसाद मिरासदार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन आनंदा पवार यांनी केले. मान्यवरांचे परिचय म.सा.प.शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रा.रविंद्र कोकरे यांनी करुन दिले. आभार शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी मानले. संमेलन उद्घाटन समारंभासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप, फलटण ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत दाणी, श्रीपाद विभुते, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र फडतरे, जयंत सहस्त्रबुद्धे, इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजी – माजी पदाधिकारी, सदस्य, साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love