फलटण तहसील कार्यालयात संभाव्य पाणीटंचाईबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न; नीरा उजवा व धोम-बलकवडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला न्याय देण्याच्या स्पष्ट सूचना.
। लोकजागर वृत्त । फलटण । २७ नोव्हेंबर २०२६ ।
संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्वंकष नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी दिल्या. फलटण तहसील कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव यांच्यासह तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने नीरा उजवा कालवा तसेच धोम-बलकवडी कालव्याच्या आवर्तनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कालव्याचे आवर्तन सुरू असताना दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याची संबंधित विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक गावाला न्याय मिळेल अशा पद्धतीने आवर्तनाचे व्यवस्थापन करावे, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता विहिरींचे अधिग्रहण, खासगी बोअरवेल अधिग्रहण, टँकरची उपलब्धता तसेच आवश्यकतेनुसार नवीन विहिरी व बोअरवेल घेण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व पर्यायी व्यवस्था आधीच तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांच्या स्टोरेज टाक्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण टाक्यांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल, तसेच टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ठिकाणी टँकर फीडिंग पॉइंट विकसित करावेत, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले. दुष्काळी परिस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकसंघपणे, परस्पर समन्वय राखून आणि जबाबदारीने काम करत केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता दीर्घकालीन नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत कृषी विभागाकडून तालुक्यातील ओला व सुका चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला असून, आगामी काळात पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी सध्या सिंचनाची सुविधा असलेल्या शेतजमिनींमध्ये चारा पिकांची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यातील पशुधनाची सविस्तर माहिती घेत भविष्यात चाऱ्याची कमतरता भासणार नाही यासाठी आवश्यक ते नियोजन आतापासूनच करण्याचे निर्देश दिले गेले. यासोबतच लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाझर तलाव व बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे, गाळमुक्त शिवार अभियान तसेच नाला खोलीकरणाच्या कामांचा आणि वनविभागाच्या अखत्यारीतील बंधारे व गाळ उपसा कामांचा आढावा घेण्यात आला. वनविभागाच्या मालकीच्या डोंगर व जमिनींवर चेन बंधारे बांधण्यासाठी योग्य नियोजन करून ही कामे मार्गी लावावीत, अशा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संभाव्य दुष्काळ व टंचाईच्या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये, अशा आदेशवजा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकारी बँकांशी संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देत शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. तसेच, संभाव्य दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना अथवा समाजातील कोणत्याही घटकाला पाणी, चारा किंवा इतर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने आमच्याशी संपर्क साधावा आणि नागरिकांनी घाबरून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करावा, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्रितपणे काम करून या संकटावर यशस्वीपणे मात करू, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी दिली.
