‘फुले -आंबेडकरी समकालीन राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना किशोर बेडकिहाळ. सोबत दिनकर झिंब्रे, रमेश इंजे, प्रा.प्रशांत साळवे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, भरत शेळके, मधू कांबळे.
। लोकजागर । सातारा । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक राजकारणाचे स्वप्न साकार करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी फुले – आंबेडकरी चळवळीने आत्मपरीक्षण व कठोर चिकित्सा करावी”, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी संपादित केलेल्या ‘फुले -आंबेडकरी समकालीन राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, विश्वस्त प्रा.प्रशांत साळवे, लेखक प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे उपस्थित होते.
किशोर बेडकिहाळ म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्षाच्या माध्यमातून निकोप, वर्गीय राजकारणाचा व्यापक प्रयोग प्रारंभी केला होता. पुढे त्यांना तो सोडावा लागला ही मोठी शोकांतिका आहे. देशातील बहु जातीय, खंडित समाज व्यवस्थेत एकपक्षीय विचार यशस्वी होऊ शकणार नाही. हे लक्षात घेऊन डाव्या पुरोगामी शक्ती आणि आंबेडकरी शक्तींनी हातात हात घालून एकत्रितपणे फॅसीझम रोखण्याचे काम केले तरच समाज परिवर्तन व विकासाचे, सत्ता परिवर्तनाचे, जातीअंताचे राजकारण यशस्वी होऊ शकेल. लढाई अतिशय किचकट आणि दीर्घ पल्ल्याची आहे. डाव्या आणि आंबेडकरी चळवळी क्षीण झाल्या आहेत. त्यांचे सांस्कृतिक राजकारणाच्या अवकाशाकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. चळवळीने निराश न होता चिकाटीने काम करण्याची गरज आहे.”
प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी सेक्युलर मुव्हमेंट आणि संपादित केलेल्या पुस्तका विषयी भूमिका विषद केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सत्ता परिवर्तनाचे मिशन यशस्वी करण्यासाठी त्यांचा मूल्यविचार, तत्त्व आणि धोरणावर राजकारण उभे राहिले पाहिजे. त्यासाठी चळवळीमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. आपण हाती घेतलेल्या व्यवस्था परिवर्तनाच्या प्रयोगातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे. धर्मावर आधारित जगात कोणत्याही राष्ट्राचे भले झालेली नाही. हे लक्षात घेऊन हिंदूराष्ट्र निर्मितीला हिंदूनी विरोध करावा कारण त्यामध्ये त्यांचेच नुकसान सर्वाधिक आहे. देशाला आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही.”
मधु कांबळे म्हणाले, “सध्याची निवडणूक पद्धत सदोष असून धनवान, गुंडांचीच सत्ता प्रस्थापित करणारी आहे . ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाची निवडणूक पद्धती अस्तित्वात आणण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे.”
दिनकर झिंब्रे म्हणाले, “फुले आंबेडकरी चळवळीने लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी संविधान मोरॅलिटी व धम्मनीती रुजवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे अपहरण करण्याचे आणि लोकांना प्रतिकांमध्ये अडकवण्याचे काम जोरात सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनामा मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा अशा प्रतिगामी संस्थांशी कोणतेही सख्य जोडणार नाही, असे असताना बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिल्याचा डांगोरा पिटला जातोय. नकारात्मक, प्रतिक्रियांच्या राजकारणात न अडकता चळवळीने आपला अजेंडा राबवण्याची आणि तरुण पिढीची मानसिकता घडविण्यासाठी प्रबोधनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.”
भरत शेळके यांनी पुस्तका विषयी मनोगत व्यक्त केले.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष केशवराव कदम यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ, प्राचार्य डॉ.संजय कांबळे, आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.